आठ वर्षांपासून भारतात वास्तव्य करणाऱ्या यमनच्या तरुणाला एक वर्षे एक महिने सहा दिवसांचा कारावास

औरंगाबाद ,६ मे /प्रतिनिधी :-व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील आठ वर्षांपासून भारतात वास्तव्य करणाऱ्या  यमनच्या तरुणाला एक वर्षे एक महिने सहा दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी ठोठावली. विशेष म्हणजे न्‍यायलयाने आरोपीला शिक्षेविरोधात अपील करण्‍याची मुभा देत त्‍याचा पासपोर्ट परत करुन त्‍याची कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देशही दिले. अली मोहम्मद अवद बीन हिलाबी (३१, रा. अबरार कॉलनी, बीड बायपास रोड मुळ रा. सना—६०, यमन) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्याचे शिपाई कारभारी नलावडे (५०) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार,पोलिस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी सेलकडून नियमितपणे विदेशी नागरिकांची तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान, यमन येथील चार नागरिक शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी चौघांच्या कागदपत्रांची तपासणी करुन चौकशी केली असता आरोपी अली मोहम्मद अवाद हा गेल्या आठ वर्षांपासून अवैधरित्या भारतात राहत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आरोपीने शहरातील तरुणीशी विवाह करुन संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडे पोलिसांना भारताचे मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आढळून आले आहे. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक दासरे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. न्यायालयाने आरोपी अली मोहम्मद अवद याला दोषी ठरवून विदेशी नागरिक कायद्याच्‍या कलम १४ अन्‍वये एक वर्षे एक महिना सहा दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाच्‍या शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिन्‍याची शिक्षा भोगावी लागणार आहे. पैरवी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार व्‍ही.बी. साळवे यांनी काम पाहिले.