शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट – शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा 

खुलताबाद ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन विविध केंद्र व राज्यस्तरीय शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी खासदार शरद पवार यांना पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.   

शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना शासकीय कृषी विषयक समित्यांवर प्रतिनिधित्व मिळावे. याबाबत शासन निर्णय व्हावा. यामुळे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांना होईल. शासकिय योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यात मदत होईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून नवीन सुधारणा केल्या जातील. यामुळे शासकिय योजनांचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे  मिळेल. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना टोल माफी, एस टी बस मोफत प्रवास सवलत देण्यात यावी. विधान परिषदेत शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावे. बियाणे कायद्यात सुधारणा करुन सर्व बियाणे बिज प्रमाणिकरण यंत्रणेच्या नियंत्रणात तयार करून शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून घ्यावे. यासह  प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१४ ला मागील शासन काळात शरद पवार यांनी प्रस्तावित केलेली होती. सरकार बदल झाल्याने योजना लागु केली गेली नाही. उलट यात जोखिम स्तर ८० ते ९० टक्के  होता. सरकार बदलल्याने असतांना जोखीम स्तर ७० ते ९० टक्के होता.  तो शेतकऱ्यांना फायदेशीर होता. ही माहिती पुराव्यानिशी पिक विमा तज्ञ प्रकाश पाटील यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांच्या मागण्यांची पवारांनी सखोल घेतली.यावेळी शासकिय कृषी पुरस्कार शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष प्रकाश पाटील (धुळे), उपाध्यक्ष प्रल्हाद वरे (बारामती), राज्य कार्यकारिणी सदस्य बाळकृष्ण पाटील ( जळगाव) , मोह संवर्धन मंडळाचे संयोजक  बी जी महाजन (चुंचाळे) ,कृषी क्रांती हायटेक ऍग्रो प्रोड्युसर कंपनी (औरंगाबाद )चे  अध्यक्ष कृष्णा पवार (औरंगाबाद) उपस्थित होते.