विना रॉयल्टी मुरूम वाहतूक करू देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच ; शिवराईचा तलाठी नजन एसीबीच्या जाळ्यात

वैजापूर, २ मे  /प्रतिनिधी :- विना रॉयल्टी मुरुम वाहतूक करु देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. ज्ञानेश्वर मोहन नजन (45 वर्ष रा. वैजापूर) असे या लाचखोर तलाठयाचे नाव आहे.

तालुक्यातील शिवराई येथील तक्रारदार यांना ट्रॅक्टरने मुरमाची वाहतूक करायची होती. या वाहतुकीसाठी त्यांनी तलाठी ज्ञानेश्वर नजन याच्याकडे विचारणा केली. यावेळी वाहतूक करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी तलाठयाने केली. मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथील लाचलूचपत विभागाला संपर्क करत याबाबत तक्रार दाखल केली.

या आधारे सोमवारी लाचलूचपत विभागाच्या पथकाने शहरातील लाडगाव रस्त्यालगत असलेल्या देवगिरी दवाखान्यासमोर सापळा रचला.  सायंकाळी सात वाजता याठिकाणी तलाठी ज्ञानेश्वर नजन याला तक्रारदार याच्याकडून दोन हजारांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,उपअधीक्षक मारोती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे,पोलीस नाईक साईनाथ तोडकर,भीमराज जीवडे,रविंद्र काळे,पोलीस अंमलदार चांगदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.