राज ठाकरेंच्या सभेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्याला ठोठावला एक लाखांचा दंड

औरंगाबाद ,२९ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनादिवशी औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका केली आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंडही ठोठावला आहे.

सभा रद्दच करण्यात यावी, अशी ठाम मागणी करतानाच सभा झालीच, तर पोलिसांच्या अटींचं काटेकोर पालन होणं आवश्यक असल्याची भूमिका जयकिशन कांबळे यांनी याचिकेमधून मांडली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.राज ठाकरेंच्या सभेविरोधातील ही जनहीत याचिका एक लाखांचा दंड ठोठावत फेटाळली आहे. याचिका राजकीय हेतून प्रेरित असल्याचे नमूद करत पुढील तीन दिवसांमध्ये एक लाख रूपये भरण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीने इशारा दिला आहे.भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पुन्हा एकदा सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. “१ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. ती सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. कालच आम्हाला कळलं की राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत”, असं ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी रवाना होणार आहेत. पुण्यातून निघाल्यावर राज ठाकरे आधी पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या वढू  या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.  राज ठाकरेंसोबत पुण्यातून मनसे कार्यकर्त्यांच्या सव्वाशे ते दिडशे गाड्यांचा ताफा असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झाले आहे. 3 मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, त्यापुर्वी राज ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुण्यात असणार आहेत. 

मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सभेची तयारी करण्यासाठी आज औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. पण ते दाखल झाले तेव्हा एक विचित्र घटना घडली. अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले. त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात बाबा पट्रोल पंपवर हजर होते. कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. पण अमित ठाकरे बाबा पेट्रोल पंपावर न पोहोचता ते त्यांच्या औरंगाबाद येथील मुक्काम स्थळी पोहोचले. त्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले. अमित ठाकरेंकडून GPS मुळे गडबड झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अमित ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते बाबा पेट्रोल पंप येथे जमले होते. पण GPS च्या चुकीमुळे अनपेक्षित घडलं. अमित ठाकरे बाबा पेट्रोल पंपवर न पोहोचता त्यांना आज जिथे मुक्काम करायचा आहे त्याठिकाणी पोहोचले.