वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या भाडेकरुला कोठडीत ठेवण्याचे आदेश

औरंगाबाद ,१३ एप्रिल /प्रतिनिधी

कर्ज बाजारीला कंटाळून पूर्व घरमालाकाच्या साडेपाच वर्षाच्या मुलाचे  अपहरण करुन वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या  भाडेकरुला सोमवारी दि.12 सायंकाळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत दि.15 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी मंगळवारी दि.13 दिले. संतोष रमेश सनान्से (29, रा. ऊंडणगाव, ता. सिल्लोड) असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव आहे.

 वडगाव कोल्हाटी येथील पौर्णिमा सोमशेखर हिरेमठ (42, गट क्र. 11, प्लॉट क्र. 6) या अंबेलोहळ येथील स्व. मधुकरराव देशपांडे शिक्षण संस्था चालवतात. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास वाजता शाळेवर गेल्या होत्या. त्या शाळेत असताना ऑफीस बॉय अमोल जाधव याच्या मोबाइलवर सोमशेखर हिरेमठ यांनी संपर्क साधत मुलगा शौर्य (पाच वर्ष सहा महिने) हा घरात दिसून येत नसल्याचे सांगितले. तेव्हा पौर्णिमा गच्चीवर नाही तर खाली खेळत असेल असे म्हणत फोन ठेवला. मात्र, तोपर्यंत पौर्णिमा यांच्या मोबाइलवर अपहरणकर्ता संतोष सनान्से याचे चार मिसकॉल होते. त्यामुळे पौर्णिमा यांनी सनान्सेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने मुलगा शौर्य याचे आपण अपहरण केले असून, त्याची सुटका करण्यासाठी वीस लाख रुपये  हायटेक कॉलेजजवळ घेऊन या, असे सांगितले. शौर्यचे अपहरण झाल्याचे कळताच भांबावून गेलेल्या पौर्णिमा यांनी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाणे गाठत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीच्या मोबाइल लोकेशनवरुन त्याला अटक केली. आरोपी हा पूर्वी हिरेमठ यांच्या घरी किरायाने राहत होता. दोन महिन्यांपूर्वीच तो रांजणगाव येथे भाड्याने राहण्यासाठी गेल्याची माहिती हिरेमठ यांनी पोलिसांना दिली.  पोलिसांनी त्याची चौकशी केली असता कर्जबाजारीमुळे गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाइल व चाकू असा सुमारे चार हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व कपडे जप्त करणे आहे. आरोपीने सदर गुन्हा कोणासाठी आणि कोणत्या साथीदाराच्या मदतीने केला याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी न्यायालयाकडे केली.