प्रवास करताना बसबाहेर फेकला,जखमीला दीड लाख देण्याचे आदेश

औरंगाबाद ,२० एप्रिल  /प्रतिनिधी :- शहर बस मधून बसमध्‍ये प्रवास करताना बस चालकाच्‍या निष्‍काळजीपणामुळे बसबाहेर फेकल्या जावून जखमी  झालेल्या त्र्यंबक चेपटे यांना एक लाख ६५ हजार ९०० रुपये सहा टक्के व्‍याजासह दावा दाखल झाल्याच्‍या तारेखपासून देण्‍याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे अध्यक्ष एस.डी. टेकाळे यांनी दिले.

त्र्यंबक चेपटे हे वेटरचे काम करुन कुटूंबाचा उर्दनिर्वाह करतात. ४ मे २०१६ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान, चेपटे हे कामावरुन चिकलठाणा येथे घरी जात होते. बाबा पेट्रोलपंप येथून ते चिकलठाण्‍याकडे जाणाऱ्या  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या शहर बसमध्‍ये (एमएच-२०-डी-८३५४) बसले. चिकलठाणा बस स्टॉपवर उतरत असतांना, शहर बसच्या चालक राहुल सोनाजी बनकर याने बस न थांबवता निष्‍काळजीपणे चालवली, त्‍यामुळे चेपटे हे बसच्या बाहेर फेकल्या गेले. त्यात त्र्यंबक चेपटे हे गंभीर जखमी झाले. प्रकरणात बस चालकाविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तसेच चेपटे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचेविरुध्द व बस चालकाविरुध्द अडीच लाख नुकसान भरपाई मिळावी अॅड. संदीप राजेभोसले यांचेमार्फत दावा दाखल केला. सुनावणीवेळी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला. अपघातात चेपटे यांना १६ टक्के कायमस्वरूपी पंगत्व आले. त्‍यांच्‍या उजव्‍या पायात रॉड टाकावा लागला. त्‍यामुळे चेपटे यांचा मोठा वैद्यकीय खर्च झाल्याचे . राजेभोसले यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले.

सुनावणीअंती मोटार अपघात न्‍यायाधिकारणाने वरील प्रमाणे आदेश दिले.या  प्रकरणात राजेभोसले यांना सुधीरकमार घोंगडे,  दिनेश चव्हाण, प्रशांत गायकवाड, ऋषीकेश निकम यांनी सहकार्य केले.