नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे वर्षभरात लोकार्पण:सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

वैजापूर शहरातील 14 कोटी 65 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण 

वैजापूर,१५ एप्रिल  /प्रतिनिधी :- नागपूर – मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या व प्रवाशांसाठी अतिशय सुखकर असणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलदगती महामार्गाचे येत्या वर्षभरात लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजन व लोकार्पण प्रसंगी बोलतांना केली.

नगरविकास विभागातर्फे वैजापूर शहरातील विविध विकास कामासाठी सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी शहरातील दर्गाबेस परिसरात (बाजारतळ) शादीखाना सभागृह बांधकामांचे लोकार्पण झाल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आमदार रमेश पाटील बोरनारे, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मागणी केल्यानंतर वैजापूर शहरासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रका़त खैरे, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाठ, आ.रमेश पाटील बोरणारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, युवासेना सचीव राजेंद्र जंजाळ,माजी नगराध्यक्ष साबेर खान, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,  जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष शेख अकील सेठ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत,  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शिंदे यांनी संकट मोचन हनुमान मंदिर येथे टिळक रस्ता, जुना स्टेट बॅक रस्ता व शिवाजी रस्ता या तीन रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरण कामाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपूजन केले तसेच म्हसोबा चौक ते बाळासाहेब संचेती यांचे घर या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले‌. मुरारी पार्क येथे सभागृह बांधकाम व सुशोभिकरण कामाचे लोकार्पण त्यांनी केले. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी रस्त्याच्या कामात नगरपालिकेने साडे तीन कोटी रुपयांचा वाटा उचलला असून साडे आठ कोटींच्या प्रकल्पासाठी आणखी दोन कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगत निधीची मागणी केली. दोन कोटी रुपये देण्यास मंत्र्यांनी अनुमती दर्शविली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत असलेल्या जायकवाडीच्या 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्यापैकी पाच दशलक्ष लिटर पाणी वैजापूरला द्यावे अशी मागणी ही त्यांनी केली. शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्प तसेच अन्य विकास कामांसाठी आवश्यक तेवढा निधी देऊ असे शिंदे यांनी सांगितले.

येत्या दोन महिन्यांत नागपूर ते सेलू बाजार या दोनशे दहा कि.मी. लांबीच्या रस्त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येईल. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करतांना शेतकऱ्यांशी जबरदस्ती करु नका, निधीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातुन विकास कामे करा अशा सूचना नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी केल्या. रस्त्यांसाठी रोहयो मंत्री संदिपान सुमारे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश दिल्यानंतर भुमरे यांनी होकारार्थी मान हलवली.‌ करोना काळात मृत्यू पावलेल्या कुटुंबासाठी पन्नास लाख रुपयांचा धनादेश नगरपालिकेस यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचीन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपशहरप्रमुख खलील मिस्तरी, बाळासाहेब जाधव, सुलतान खान, आवेज खान, नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, प्रकाश चव्हाण, खुशालसिंह राजपूत, डॉ.परेश भोपळे, राजुसिंह राजपूत, दशरथ बनकर, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण, पारस घाटे आदींची उपस्थिती होती.

आमदारांकडे निधी खेचण्याची खुबी

आमदार रमेश बोरनारे हे अतिशय विनम्र व्यक्तिमत्व असून ते कुणावरही कधी रागावत नाहीत. त्यांच्याकडे पाठपुरावा करुन विकासकामांसाठी निधी आणण्याची कला आहे. म्हणूनच त्यांनी मागील दोन वर्षात वैजापूर शहरासह मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे असे शिंदे यांनी सांगितले. 

विकासात राजकारण नाही

महाविकास आघाडीने दोन वर्षाच्या काळात करोना प्रादुर्भाव, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारखी अनेक संकटे येऊनही अनेक विकास कामे केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. नागपूर मुंबई महामार्गामुळे केवळ सहा ते सात तासांत नागपुरहुन मुंबईला पोहचता येणार आहे. शिवसेना विकासात कुठलेही राजकारण करत नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.