ॲड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

अन्य १०९ जणांना न्यायालयीन कोठडी

मुंबई,९ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानासमोरील आंदोलनाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर १०९ जणांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ॲड. सदावर्ते यांना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले. कालच्या घटनेच्या विरोधात आज, शनिवारी राष्ट्रवादीकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केले – सरकारी वकील

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, वकील सदावर्तेंना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्या, आरोपीवरील कलमे गंभीर आहेत. त्यांनी कामगारांना भडकावले आहे. आरोपांची संख्या मोठी असल्याने त्यांची चौकशी कशी करणार? अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावर घरत म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. आरोपी क्रमांक १ सदावर्ते हेच यामागे एकटे नसून अजून काही जण त्यांच्यासोबत असणार म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. कोणाकोणाचा यात सक्रीय सहभाग आहे, यासंबंधी चौकशी करायची आहे. सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केले आहे. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. दगडफेक आणि चप्पल फेक करण्यात आली. दोन जण जखमी झालेत. रक्ताचे नमूने घेतले आहेत. दारू पिऊन कामगार होते अशी शंका होती. काही जण आपलं नाव खोटं सांगतायत, सोबत पत्ता देखील सांगत नाहीत. यासाठी देखील चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते. हे देखील तपासायचे आहे.

सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याने ही कारवाई – सदावर्ते वकील

सदावर्ते यांच्या वतीने वकील महेश वासवानी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते पीएचडी आहेत. जयश्री पाटील या देखील पीएचडी आहेत. मराठा आंदोलन सदावर्ते यांनी रद्दबातल केले. सोबतच त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सदावर्ते हे बार काऊन्सिलमध्ये देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. सरकारच्या विरोधात मोठा आवाज सदावर्ते यांनी उठवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोणत्याही सत्ताधारी राज्यकर्त्यांनी त्यांना विचारलं नाही. एका सुपरस्टारच्या मुलाला अटक होते आणि सर्व त्यावर बोलायला लागतात.

सदावर्तेंनी केले होते शांततेचे आवाहन

वासवानी पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली त्याबद्दल युक्तीवाद सदावर्ते यांनी केला आहे. यामुळे त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जायची. आज सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी या बदललेल्या आहेत. आम्ही मुंबईत आंदोलनाबाबत कुठेच नाही बोललो. आम्ही बारामतीत बोललोय आणि घुसून आंदोलन करा वगैरे आम्ही कुठेच बोललो नाही आहे. कोणत्याच वाहिनीवर आम्ही असं बोललो नाही. घटनेवेळी देखील सदावर्ते तिथे नव्हते. ते न्यायालयात होते. एका पत्रकाराने त्यांना विचारले की तुमची भूमिका काय तेव्हा त्यांनी शांततेचं आवाहन केले होते. ९२ हजार कर्मचाऱ्यांची केस होती. ते त्यात यशस्वी झालेत आणि त्याचा राग म्हणून सरकार हे करतंय. सदावर्ते यांनी नेहमीच शांतता पाळा, असे सांगितले होते. आंदोलनावेळी देखील ते सातत्याने हे म्हणत होते. जयश्री पाटील यांनी १०० कोटी रुपयांच्या अनिल देशमुखांच्या गैरव्यवहार प्रकरणी देखील दावा दाखल केला होता. सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देखील देण्यात आली नाही. यातूनच सरकारचा रोष बघायला मिळत आहे. माझ्याकडे घटनास्थळाचे सीसीटीव्ही आहेत. मात्र कुठेही सदावर्ते नाहीत.