“वाटा आपल्या हिताच्या” विचारधनावर आधारित व्याख्यान, संगीत कार्यक्रमासह पोवड्याने औरंगाबादकर मंत्रमुग्ध

औरंगाबाद,४ एप्रिल / प्रतिनिधी :-“स्वामी वरदानंद भारती “यांच्या ग्रंथावर आधारित “वाटा आपल्या हिता”च्या या विचारधनावर दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन २ व ३ एप्रिल रोजी तापडिया रंग मंदिर औरंगाबाद  करण्यात आले होते.
या वाटा फक्त “व्यष्टी” पुरत्या मर्यादित नसून त्यात “समष्टी”चा ही विचार आला.शुद्ध नैतिक आचरणाच्या अधिष्ठानावर असलेली ही संस्कृती आणि तिची जपणूक हाच या दोन दिवसीय कार्यक्रमाचा विषय होता.


या नवसंवत्सराच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याला सनातनतेचा वारसा जपत वेदपठाणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.  मंगलमय वातावरणात  “ज्ञानमय कोषाची सगळी दारे” उघडली गेली आणि हिताच्या वाटेवरच्या अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात झाली.
त्यानंतर अनालयझरयूट्यूब चैनलचे एडिटर सुशील कुलकर्णी यांचे हस्ते स्वामीजींच्या ग्रंथसंपदा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सुशील कुलकर्णी यांनी संस्कारमूल्ये सांगताना घरातील वडिलधाऱ्या माणसांकडून कळत-नकळत पिढीवर होणाऱ्या संस्काराचे महत्त्व सांगितले. 
विद्यावाचस्पती सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्याब्दिपूर्ती सोहळ्यानिमित्त परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. शेवडेनी हिंदुत्व आणि देशावरील, बौद्धिक, सांस्कृतिक आक्रमणांची विषवल्ली कशी पसरत आहे यावर प्रकाश टाकला. यानंतर संध्याकाळी मुख्य आकर्षण म्हणजे “शालिवाहन” होते. श्री वरदानंद भारती यांनी रचलेल्या शालिवाहन या महाकाव्याचे सामगायन यावेळी करण्यात आले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयाने भारावलेला धीरोदत्त नायक आणि त्याचे उदात्त कार्य अशी संकल्पना  घेऊन कथा रुपाने केलेली मांडणी, शांतीभूषण देशपांडे यांनी स्वरबध्द  केलेल्या चाली आणि वीररसाला आपल्या पहाडी आवाजाने सादर करणारे विश्वनाथ दाशरथे आणि त्यांना तालवाद्यांनी दिलेल्या साथीमुळे कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत भरत गेली आणि हा कार्यक्रम एका आगळ्या-वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचला, हा एक विलक्षण अनुभव होता. या कार्यक्रमाचे निवेदन लक्ष्मीकांत धोंड व माधुरी धोंड यांनी केले.
रविवारी३ एप्रिलला नित्य प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. “बुद्धी प्रकाशित करी आमुची तमारी” या स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेल्या सूर्याष्टकावर, चोथवे महाराजांचे प्रवचन झाले. ही रचना प्रत्ययकारी असून आत्मानुभवाची अभिव्यक्ती करणारी असत्यामुळे तीच्यातील विलक्षण प्रभावात्मकता सांगताना चोथवे महाराजांची  दिलेले चपखल दृष्टांत आणि व्यावहारिक उदाहरणे यामुळे विषय सुस्पष्ट होत होता. 

 
“यक्षप्रश्न” या महाभारतातील प्रश्नोत्तरावर आचार्य श्री वरदानंद भारती यांनी केलेले विश्लेषण विद्याविभूषित धनश्रीताई लेले यांच्या मार्मिक विचारातून ऐकतांना स्वामींच्या बहुश्रुततेची, त्यांच्या बुद्धिनिष्ठतेचे दर्शन त्यांच्या वाणीतून पदोपदी घडत होते. त्यांनी दिलेल्या मार्मिक दृष्टांतावर दृष्टीक्षेप टाकत त्यांनी त्यातील गर्भितार्थ स्पष्ट केला. हा ग्रंथ नुसता वाचनीय नसून अभ्यासनीय आणि संस्मरणीय आहे हे त्यांनी त्यांच्या शब्दातून सांगितले.
गुरुनिष्ठेचे उदात्त उदाहरण म्हणजे डॉ.स्वाती शिरडकर स्वामीजींचा जीवनपट मांडताना त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग भावोत्कटतेने सांगितले. यानंतर पार्थ बावस्कर हे “भगवान श्रीकृष्ण एक दर्शन” या विषयावर बोलले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे जीवनातील विविध दर्शन सुस्पष्ट केले. यानंतर वैद्य सुचित्रा कुलकर्णी स्वामीजींच्या “मनोबोध “या ग्रंथाबद्दल बोलल्या. वृंदा जोशी -देशपांडे “दिव्यत्वाची जेथ प्रचिती” या विषयावर बोलल्या यानंतर श्री संत दासगणू संस्थान गोरट्याचे अध्यक्ष महेश आठवले हे “व्यष्टी धर्म व समष्टी धर्म” या विषयावर बोलले. यानंतर नांदेड येथील युवा कीर्तनकार विक्रम नांदेडकर यांचे स्वामीजींच्या “राष्ट्रसंरक्षण पोवाडा” गायन झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमाचा मूळ उद्देश स्वामीजींचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावे हाच होता. या कार्यक्रमासाठी दोन्ही दिवस भरपूर प्रेक्षकांनी हजेरी लावली.ग्रंथविक्रीबरोबरच कार्यक्रमासाठी दिवसभर श्रोतृवर्ग उपस्थित होता. राधा दामोदर प्रतिष्ठान, श्रीमदसद्गुरु दासगणू महाराज प्रतिष्ठान, रेडिओ देवगिरी,राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळ दासगणू संत भक्त मंडळाने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे  संयुक्त आयोजन केले होते.