वैजापूर- रोटेगाव रस्त्यावरील उड्डाण पुलावर एसटी बसला भीषण आग ; 34 प्रवासी बचावले

Displaying IMG-20220325-WA0123.jpg

मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

वैजापूर,२५ मार्च  /प्रतिनिधी :-राज्य परिवहन महामंडळाची बस पेटल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद रस्त्यावर रोटेगाव रेल्वेस्टेशन येथील उड्डाण पुलाजवळ घडली. या घटनेत समोरुन येणाऱ्या दुचाकीलास्वाराला अन्य वाहनाने हुलकावणी दिल्याने बसच्या समोरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय नारायण पवार (50, रा. कन्नड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Displaying IMG-20220325-WA0094.jpg

कन्नडहून वैजापूरकडे येणाऱ्या या बसमध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नेरकर यांनी दिली. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, वैजापूर आगाराची कन्नड वैजापूर ही बस (क्रमांक एम.एच. 49 बी.एल 9942) ही कन्नड येथून 34 प्रवाशांना घेऊन वैजापूरला येत होती. त्यावेळी औरंगाबाद रस्त्यावर रोटेगाव येथील पुलावर समोरुन येणाऱ्या संजय पवार यांच्या दुचाकीला अन्य एका वाहनाने हुलकावणी दिल्याने ही दुचाकी बसला धडकली व समोरच्या चाकाखाली आली. यावेळी दुचाकीतील पेट्रोल तप्त जमीनीवर सांडल्याने दुचाकीने पेट घेतला व काही क्षणातच दुचाकी खाक झाली व त्यानंतर बसनेही पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच बसचालक के.जी. टुपके यांनी प्रवाशांना सावध करत बसच्या खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.यावेळी बस वाहक ए. एस. पवार यांच्यासह 34 प्रवासी तातडीने खाली उतरले.

Displaying IMG-20220325-WA0095.jpg

घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्यासह स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अनिशामन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत बस संपूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली होती. गंभीर जखमी झालेले संजय पवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Displaying IMG-20220325-WA0104.jpg

दरम्यान, या घटनेत एसटी बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप वाचले आहेत. जखमी संजय पवार हे एका लग्नासाठी अंदरसूल येथे आले होते. लग्न आटोपून परत कन्नड येथे जात असतांना हा प्रकार घडल्याने त्यांच्या जीवावर बेतले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.