वैजापूर शहरात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण आजपासून सुरू ; सेंट मोनिका शाळेतील 300 विद्यार्थ्यांचे लसीकरण

वैजापूर,२३ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील सर्व विद्यालयातील 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-19 चे कॉर्बेव्हक्स लसीकरणास  बुधवारपासून (ता.23) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी येथील सेंट मोनिका इंग्रजी शाळेतील जवळ पास 300 विद्यार्थ्यांना लसीकरणं करून विद्यार्थ्यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. 

उपजिल्हा रुग्णालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या या लसीकरणाला आरंभ जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत  झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे श्याम उचित, मंगेश मापारी, अजय जाधव, वाल्मीक दळवी, अर्चना वाघ, उर्मिला गायकवाड यांच्या पथकाने लसीकरण पूर्ण केले त्यांना या विद्यालयचे शिक्षक अमोल धामणे, राहुल नवले व कु.लोखंडे यांनी सहकार्य केले.

शहरातील शाळेतील  12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे व पालकांनी ही जागरूकपणे आपल्या पाल्याचे लसीकरण करावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी केले आहे. शहरात 26 प्राथमिक शाळा असून  एकूण विद्यार्थी संख्या 4270 आहे. यासर्व  विद्यार्थ्यांचे  टप्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयात ही लसीकरण करण्यात येणार आहे. 12 ते 14 वयोगटांतील विद्यार्थ्यांना द्यावयाची कॉर्बेव्हक्स ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे उपजिल्हा रुग्णालयाचे श्याम उचित यांनी सांगितले.