निलंगा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॕ. दिनकर पाटील यांना निलंबित का केले ?ही आहेत कारणे ?

निलंगा ,२९ एप्रिल /प्रतिनिधी 

येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी बाहेरून औषधी आणण्याची सक्ती करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने तहसीलदारांनी परवा खासगी मेडिकल वर छापा टाकला होता. अखेर संबंधित डॉ. दिनकर पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी  निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना बुधवारी ता. 28 रोजी दिले आहेत. 

सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अनेक लोकांना वेळेवर उपचार व औषधी न मिळाल्याने प्राण गमवावा लागत आहे. रूग्णालयात रूग्णाची औषधा अभावी हेळसांड होऊ नये म्हणून राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. उपजिल्हा रूग्णालयात कोरोनावर इलाज करणारी मुबलक औषधी असताना देखील येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांच्याकडून शहरातील खासगी  मेडिकल मधील औषधी घेऊन या म्हणून सक्ती करत असल्याची तक्रार एका महिलेने तहसिलदार गणेश जाधव यांच्याकडे केली.

तहसिलदार व मुख्याधिकारी यानी उपजिल्हा रूग्णालयात या बाबीची चौकशी केली असता कोरोनावर उपचार करणारे औषध  रूग्णालयात असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी श्री. पाटील  खाजगी मेडिकल मधील औषधी का मागवून घेतात याबाबत अधिक चौकशी केली असता संबंधित वैद्यकीय अधिकारी व खाजगी मेडिकल यांची मिलीभगत असल्याचे कारणावरून तहसीलदारांनी काही फार्मासिस्ट घेऊन येथील महाजन मेडिकलमध्ये चौकशी केली असता एक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे उपलब्ध पावत्यावरून लक्षात आले आहे. याबाबत छापा टाकून त्या पावत्या जप्त केल्या असून सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी ह्या महाजन मेडिकल असलेल्या दुसऱ्या मजल्यावर खाजगी दवाखाना चालवत असतात त्यामुळेच ते खाजगी मेडिकल मधून औषधी आणण्यासाठी सक्ती करत आसल्याचे  सांगण्यात आले. 

 मदनसुरी ता. निलंगा येथील एका महिलेच्या पतीचे आठ दिवसापूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. सदरील महिलेच्या वडिलांना पण कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय निलंगा येथे दाखल केले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने १३ हजार पाचशे रूपयांची औषधी शहरातील महाजन मेडिकल मधून आणण्यासाठी पावती दिली व ती औषध त्यानी घेऊनही आले. संबंधित महिलेकडे पुन्हा लिहून दिलेली औषध आणण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्या महिलेने थेट तहसिलदार गणेश जाधव यांच्याकडे धाव घेतली व आपले म्हणणे सांगितले. त्यानंतर तात्काळ तहसिलदार यांनी छापा टाकला रूग्णांना खाजगी मेडिकल मधून औषध आणायला लावल्याचे सिध्द झाल्याने सदरील वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी असा अहवाल तहसीलदार गणेश जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. 

तहसीलदार यांच्या अहवालानुसार  डॉ. दिनकर पाटील यांची या घटनेबाबत कामात निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, अर्थिक फसवणूक करणे आदी कारणाचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी बुधवारी ता. 28 रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबीत करण्याचे आदेश दिले असून आता याबाबत निलंबनाचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक काढून त्यांना निलंबित करणार आहे. यामुळे येथील उपजिल्हा  रूग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.