आजवरच्या वीजपुरवठ्याचा महावितरणकडून महाविक्रम तब्बल २३६०५ मेगावॅटचा विक्रमी सुरळीत वीजपुरवठा

औरंगाबाद :  उन्हाच्या वाढत्या झळांमुळे राज्यामध्ये विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये मंगळवारी (दि. १५) महावितरणने मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार वीजपुरवठ्याचा महाविक्रम नोंदविला व मागणीप्रमाणे तब्बल २३ हजार ६०५ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा केला. दरम्यान मुंबईसह राज्यात या दिवशी २७ हजार २१२ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली.
    उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्याभरात विजेच्या उच्चांकी मागणीचे इतिहास घडले आहे. या आधी १९ फेब्रुवारीला महावितरणकडून सर्वाधिक उच्चांकी २३ हजार २८६ मेगावॅट विजेचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आला होता. त्याआधी दि. ८ फेब्रुवारीला २३ हजार ७५ तर दि. १२ फेब्रुवारीला २३ हजार १६३ मेगावॅटचा मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे विजेच्या मागणी देखील सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये विजेची मागणी २३ हजार ते २३ हजार ५०० मेगावॅट दरम्यान स्थिरावली आहे. मात्र तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये ही २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत विजेची विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आलेले नाही व तशी गरज भासणार नाही याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यासाठी सध्या महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे.
    महावितरणच्या विक्रमी कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून उपलब्धतेचे नियोजन करीत विजेची ही आजवरची सर्वाधिक व विक्रमी मागणी पूर्ण करण्यात महावितरणने यश मिळविले.
    महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून मंगळवारी (दि. १५) महानिर्मितीकडून ६ हजार ५७८ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार ९११ मेगावॅट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ७२२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. सोबतच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतांमधून सौर ऊर्जा- २५८५ मेगावॅट, पवन ऊर्जा- ६०३ मेगावॅट तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून १५०० मेगावॅट असे एकूण ४ हजार ६८८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. उर्वरित विजेची मागणी ही कोयना व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ६१२ मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून ७२२ मेगावॅट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ३७२ मेगावॅट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे.