पळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून या अर्थसंकल्पातील विकास पंचतत्वात विलीन केला-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई,११ मार्च / प्रतिनिधी :- राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. पळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. मराठा, कुणबी, धनगर, शेतकरी, नोकरदार, युवा वर्ग, व्यावसायिक आणि राज्यातील बारा बलुतेदार, अशा सर्वांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

एका गोष्टीचा आनंद आहे की, पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता पुन्हा त्या योजना सुरू करत आहे. समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि बुलेट ट्रेनला आधी विरोध केला आणि आता पुन्हा घोषणा करत आहेत. त्यामुळे हसावे की रडावे ते कळेना, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापूर्वीची घोषणा आज पुन्हा केली. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतंय, असा सवालही त्यांनी केला आहे.

तसेच काही घोषणा सोडल्या तर या अर्थसंकल्पाने काय दिलं नाही. देशातल्या बावीस राज्यांनी पेट्रोल डिझेलचा कर कमी करून दिलासा दिला. पण राज्याची अर्थव्यवस्था चांगली असूनही पेट्रोल डिझेलचा कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी दिली नाही. आता सायकल मोर्चा काढणारे पटोले आणि काँग्रेस कोणता मोर्चा काढणार आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भासाठी काही दिलं नाही. मराठवाडा ग्रीडचा खून या सरकारने केला आहे. कुठल्याच घटकाला काही दिलं नाही. उत्तर महाराष्ट्र हे बजेटमध्ये दिसत नाही. ते नकाशावर आहे याचा विसर पडला आहे. केंद्र सरकारच्या योजना मात्र जोरात घोषित करण्यात आल्या आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.