पंतप्रधान मोदींनी घेतली ‘मोरबी’त जखमी व पीडित कुटुंबीयांची भेट

या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंची माहिती मिळवण्यासाठी सविस्तर आणि व्यापक चौकशी करणे ही सध्याची गरज असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

मोरबी : गुजरातमधील पूल दुर्घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोरबीला पोहोचले. येथे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी एसपी कार्यालयात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या २६ कुटुंबांचीही भेट घेतली. त्यांनी येथील अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. मोरबी येथे येताच पंतप्रधानांनी प्रथम घटनास्थळी जाऊन तुटलेल्या पुलाची पाहणी केली.

गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत झालेल्या मोरबी येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत १३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघाताच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी मृतदेहांचा शोध सुरू केला आहे.दरम्यान, गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान म्हणाले की अधिकाऱ्यांनी दुर्घटना बाधित कुटुंबांच्या संपर्कात राहावे आणि या दुःखद  प्रसंगी त्यांना सर्व प्रकारची मदत मिळेल, याची खात्री करावी.

अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना बचाव कार्य आणि दुर्घटना बाधितांना पुरवण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली.

पंतप्रधान म्हणाले की या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंची माहिती मिळवण्यासाठी सविस्तर आणि व्यापक चौकशी करणे ही तातडीची गरज आहे.  या चौकशीमधून लक्षात आलेल्या उपाययोजना लवकरात लवकर लागू करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहराज्यमंत्री हर्ष संघवी, गुजरात सरकारमधील मंत्री ब्रिजेश मेरजा, गुजरातचे मुख्य सचिव, राज्याचे डीजीपी, स्थानिक जिल्हाधिकारी, एसपी, पोलिस महानिरीक्षक, आमदार आणि खासदार आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

त्यापूर्वी, मोरबी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी पूल दुर्घटनेच्या स्थळाला भेट दिली. दुर्घटनेतील जखमी उपचार घेत असलेल्या स्थानिक रुग्णालयात ते गेले. बचाव आणि मदत कार्यात सहभागी झालेल्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली.