आगामी महापालिका निवडणुका लांबणीवर, राज्य सरकारची खेळी यशस्वी

मुंबई : आगामी महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य सरकारने केलेली खेळी यशस्वी ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्याबाबतच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वाक्षरी केली. त्यामुळे प्रभार रचना ठरवण्याचे तसेच निवडणुका घेण्याचे अधिकार सरकारकडे आलेत.

ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणूक घ्यायची नाही, अशी रणनीती सरकारने आखली होती. त्यादृष्टीने सध्याच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर हा कायदा करण्यात आला. त्यामुळे निवडणुका तब्बल 6 महिने पुढे ढकलल्या जाणार आहेत.

राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 6 महिन्यापेक्षा अधिक वेळ निवडणूक घेता येऊ शकणार नाही, म्हणून त्यापूर्वी याबाबत काम करणार आहोत. इम्पिरिअल डेटा तीन महिन्यात गोळा करू अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.