आता लक्ष्य मुंबई! मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रदेश कार्यालयासमोर फडणवीसांचा एल्गार

Image

मुंबई ,११ मार्च / प्रतिनिधी :- महाराष्ट्रामध्ये सत्तांतर अटळ आहे. आता लक्ष्य मुंबईवर असून मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढू, असा इशारा शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला दिला. गोव्यातील विजयानंतर मुंबईत आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे मुंबई भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे.

Image

यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्हाला सगळ्यांना चार राज्यातील विजयाचा मनापासून आनंद झाला आहे. या निवडणुकीने सिद्ध केले की, सामान्य माणसाच्या, कष्टकरांच्या मनात अजूनही एकच नेते आहेत. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदीजींच्या नेतृत्वात भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला. परंतू ही लढाई अजून संपलेली नाही. खरी लढाई मुंबईत होईल. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत. मुंबई महानगर पालिकेला भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत दम घेता येणार नाही. मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्यासाठी आपण सज्ज राहावं, असं फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

Image

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विजयाचा आनंद एक दिवस असतो. आम्ही तो साजरा केला. आज रात्रीपासून पुन्हा एकदा कामाला लागू. ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, महिला, दलित आदिवासी यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारविरोधात पुन्हा संघर्ष सुरू होईल. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराच्या विळखण्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आहे. ती पार पाडू.

Image

देशातील चार निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने अन्य निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. २०१७ साली सत्तेत आल्यानंतर भाजपला त्यांनी जिंकलेल्या चारही राज्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यात यश आलंय. गोव्यातील एकहाती विजय आणि उत्तर प्रदेशात मोदींसह योगींचा करिष्मा भाजपचं स्थानिक पातळीवर बळ वाढवणारा आहे.

Image

यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव सर्वात चर्चेत आलंय. फडणवीस गोव्याचे प्रभारी झाल्यानंतर भाजपला सत्ता मिळाली. याआधी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी देण्यात आली होती. फडणविसांनी ती देखील पार पाडली, आणि नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करत भाजप पुन्हा सत्तेत आली.

गोव्यात सत्ता स्थापनेची सोय लावून देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले. त्याआधीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांपासून भाजपच्या बड्या नेत्यांची फौज फडणवीसांच्या स्वागतासाठी तयार होती. मुंबईच्या प्रदेश कार्यालयासमोर भाजपने जल्लोष केला.

Image

कितीही मळमळ झाली तरी मोदीच येणार!

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतानाच, विरोधकांवर हल्ला चढवला. कितीही मळमळ झाली तरी, मोदीच येणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांच्या निकालानंतर मोदीजींची जादू आपण पाहिलीच, त्यामुळं मोदी है तो मुमकिन है! निवडणुकीत दुसऱ्या सेनेचं शिवसेना काय झालं? आपण तेही पाहिलं आहे.

Image

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात जाऊन शिवसेनेनं आव्हान दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी गर्जना केली होती की आम्ही प्रमोद सावंतांना हरवणार. शिवसेनेचे सगळे नेते तिकडे गेले. पण, तिथं शिवसेनेला फक्त ९७ मतं मिळाली आहेत. ही भाजपची ताकद आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यांची लढाई भाजपाशी नसून नोटाशी होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज नोटापेक्षाही कमी आहे, असं फडणवीस म्हणाले.

गोव्यातील विजयात मोलाचा वाटा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले. नेत्यांनी यावेळी नाचून या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. फडणवीस यांनी सुरुवातीला सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचेही आभार मानले. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली, असे फडणवीस म्हणाले.

करोनाकाळात मोदी आहेत. मोदी आपल्याला मरू देणार नाहीत. बेरोजगार, उपाशी ठेवणार नाहीत असा जो सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटतो, तो विश्वास यातून परावर्तीत झाला आहे, असे फडणवीस म्हणाले. या विजयाचा आनंद सगळ्यांनाच झाला असं नाही. काही लोकांना इतकी मळमळ झाली की, अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा असं आहे. इतकी मळमळ बरी नाही. कितीही मळमळ झाली तरी येणार तर मोदीच. काळजी करू नका. या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, महिलांचा आशीर्वाद मोदी आणि भाजपला आहे, असेही फडणवीस म्हणाले.