राज्यात १८८१ तर मुंबईत १२४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी राज्यात तब्बल एक हजार ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत १२४२ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 8 हजार 432 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5 हजार 974 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1 हजार 310 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात मागील २४ तासात ८७८ रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट ९८.०२ टक्के इतका आहे. तर कोविडमुळे मृतांची टक्केवारी १.८७ टक्के आहे. परंतू चिंतेची बाब म्हणजे राज्यात बीए ५ व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. पुण्यातील महिलेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. बीजे मेडिकल कॉलेजनुसार, जीनोम सिक्वेसिंगच्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला. त्यात पुण्यातील ३१ वर्षीय महिलेला बीए ५ व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आले. ते अधिक संसर्गजन्य आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे दक्षिण आफ्रिकेत पाचवी लाट आली आहे.

दरम्यान, मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरीही ९५ टक्के रुग्ण लक्षणेविरहित असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ संजीवकुमार यांनी दिली. दर दिवसाला किमान ४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन उपचार दिले जात असल्याचेही ते म्हणाले. रुग्णांना प्रामुख्याने पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत तसेच मरोळ येथील सेव्हन हिल्स येथे दाखल करुन उपचार दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशात ३७१४ नवे कोरोनाग्रस्त

नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३ हजार ७१४ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २,५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सोमवारी ४,५१८ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यातुलनेत आज काहीशी कमी नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २६ हजार ९७६ सक्रिय कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत ५ लाख २४ हजार ७०८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर ४ कोटी २६ लाख ३३ हजार ३६५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुन्हा एकदा लसीकरणावर जोर दिला जात आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत १९४ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.