पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ,२१ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- देशात आणि राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण असून महाराष्ट्र राज्यातही इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा तसेच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात वाढ होत आहे. उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात येत असल्याने महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये गुंतवणूक वाढीसाठी ‘सीए’ समुदाय मोठा वाटा उचलू शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ICAI द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल काँग्रेसचा समारोप समारंभ झाला. यावेळी जागतिक लेखापाल काँग्रेसच्या अध्यक्ष अस्मा रस्मौकी, ICAI चे अध्यक्ष देवाशीष मित्रा, सचिव जयकुमार बत्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाटी व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ICAI द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल परिषदेचे आयोजन आपल्या देशात आणि विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्यात आले ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. “Building Trust Enabling Sustainability” या थीमवर यामध्ये व्यापक विचारमंथन झाले. या मंचाद्वारे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विषयांबाबतही उहापोह झाला. आकर्षित करणारा असा सीएचा हा अभ्यासक्रम असून लेखापालन क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सनदी लेखापालांनी देशातील करदात्यांना कर भरण्याचे महत्व पटवून देण्यावर भर द्यावा. अर्थव्यवस्थेला त्याव्दारे बळकटी देण्याचे कामच आपण करत असता असेही श्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यतेची, स्टार्ट अप्स, युनिकाॅर्नची राजधानी

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखापालांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. सीए केवळ उद्योगांना चालना देण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठीच नव्हे तर देशात गुंतवणूक आकर्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्योजकता वाढीसाठी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, युनिकाॅर्न असे अनेक उपक्रम आणले. अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळत असते. महाराष्ट्र राज्य आता नाविन्यतेची, स्टार्ट अप्स व युनिकाॅर्नची
राजधानी बनत आहे.
25 टक्क्यांहून अधिक स्टार्ट अप्स आणि युनिकाॅर्न राज्यातील आहेत. या सर्वांच्या योग्य अंमलबजावणीसाठीही सीएंना महत्त्वाची भूमिका बजावता येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. देशात जीएसटी संकलनात राज्याचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यातील जीएसटी करसंकलनात वाढ झाली आहे. तसेच करदात्यांच्या तक्रारींचे निराकरणही त्वरित करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.
‘स्पीड आॅफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड आॅफ डेटा’ यावर अधिक भर देण्यात येत आहे.
शासनाने रस्ते, मेट्रो आणि दळणवळणांच्या इतर माध्यमांना बळकट करण्यात विशेष लक्ष दिले आहे. वेगाने विकास करताना महाराष्ट्रात पोषक औद्योगिक वातावरण निर्माण केले असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

जागतिक लेखापाल काँग्रेसच्या अध्यक्ष अस्मा रस्मौकी म्हणाल्या, ICAI द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल काँग्रेसचे मुंबईत यशस्वी आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट आयोजनाने विविध देशांतील प्रतिनिधी भारावले. आजच्या बदलणा-या जगात प्रत्येकाने सतत अद्ययावत असले पाहिजे. लेखापाल क्षेत्रात विश्वासार्हता खूपच महत्वाची आहे. व्यवसायातील प्रत्येक घटकाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. दूरच्या भविष्याचा विचार करून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे असेही रस्मौकी यांनी सांगितले.

 (वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्स (WCOA) दर चार वर्षांनी एकदा आयोजित केली जाते, ही “ऑलिम्पिक ऑफ द अकाउंटन्सी प्रोफेशन” म्हणून प्रसिद्ध आहे.

मुंबईत 21 व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्सच्या आयोजनाच्या निमित्ताने 100 हून अधिक देशांतील 9000 हून अधिक प्रतिनिधी भारतातील सर्वात मोठ्या अकाउंटिंग फेस्टिव्हलमध्ये एकत्र आले.

 इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (IFAC) च्या नेतृत्वाखाली व्यावसायिक अकाउंटंट्सची सर्वात प्रतिष्ठित जागतिक स्पर्धा आहे. IFAC ही अकाउंटन्सी व्यवसायाची जागतिक संस्था आहे ज्यामध्ये 135 देश आणि अधिकारक्षेत्रातील सदस्य आणि सहयोगी म्हणून 180 संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: “स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.

स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिली.

श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा. स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्रीमती लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडीश आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडनदेखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषणविरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली.

माईक हँकी यांनी अमेरिका-महाराष्ट्र द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी भेट घेऊन माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शहरे, गावे आणि तालुके सार्वजनिक वाहतुकीने जोडलेले आहेत. ही वाहतूक व्यवस्था प्रदूषणविरहित करुन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी येत्या काळात राज्यात हरित ऊर्जा वापरावर भर देऊन हरित ऊर्जा उद्योगवाढीला चालना देण्यात येणार आहे. अमेरिकेने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात या क्षेत्रात तसेच कौशल्य आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र हरित ऊर्जा वापरावर भर देत असल्याचे उदाहरण सांगताना उपमुख्यमंत्री यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ई- बसेस सुरु केल्याचे सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंचामृत संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्या दृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावले उचलत असून, यासाठी अमेरिकेसारख्या देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासन आवश्यक सुविधांसह सर्व सहकार्य करण्यावर भर देत आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून, येणाऱ्या काळात अमेरिकेतून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यासाठी पोषक वातारण तयार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने कौशल्य विद्यापीठ राज्यात स्थापन केले असून, या विद्यापीठाअंतर्गत कौशल्य आधारित उद्योगांचे जाळे वाढविण्याच्या दृष्टीने अमेरिकन कंपन्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी माईक हँकी म्हणाले की, महाराष्ट्रातील वास्तव्य आपणास आवडत असून गेल्या काही काळात राज्याच्या विविध भागांना आपण भेटी दिल्या आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी, हरित ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांत अमेरिकन उद्योजक आपला व्यवसाय करत असून येणाऱ्या काळात अमेरिकेतील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याही ते म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबईचे वाणिज्यदूत यांचे राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, अमेरिकेच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक, डॉ. मनिष मल्के उपस्थित होते.