मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प-अर्थसंकल्पावर आ.सतीश चव्हाण यांची प्रतिक्रिया

औरंगाबाद,११ मार्च / प्रतिनिधी :- राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज कोरोनाच्या आर्थिक संकटातून राज्याला बाहेर काढणारा भविष्यवेधी अर्थसंकल्प मांडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी 50 कोटी, वसमत येथे हळद पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता मा.बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून यासाठी 100 कोटी, पैठणच्या जल पर्यटन केंद्रासाठी भरीव निधी, औरंगाबाद येथील वंदे मातरम सभागृहासाठी 43 कोटी तसेच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 10 कोटी रू. इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातून मराठवाड्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी मराठवाड्याच्या विकासाला नक्कीच चालना देणारा ठरणार आहे.असे आमदार सतीश चव्हाण प्रतिक्रियेत म्हटले आहे.

जिल्हा परिषद शाळा बांधकाम व इतर सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षीक योजनेतून 5 टक्के निधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 7 मार्च रोजी मी यासंदर्भात सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचा नक्कीच कायापालट होईल. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे मन:पूर्वक आभार आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले.