पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला नाही तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघेल-माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला नाही तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघेल” अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच, त्यांनी ‘मोदींचा पराभव कार्याचा असेल तर सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल,’ असा सल्लादेखील दिला आहे. औरंगाबादमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पार पडले. यावेळी सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ पटेल, माजी मंत्री अनिल पाटील, नामदेव पवार, माजी आमदार सुभाष झांबड यांची उपस्थिती होती.

ते म्हणाले की, “लोकसभा निवडणूक २०२४मध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव नाही झाला, तर पुढच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीने होणार नाहीत. ते जिंकले तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघेल.​​ लोकसभेत नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे असेल, तर देशामधल्या ३८ पक्षांना एकत्र येऊन लढावे लागेल. भाजपला देशात मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही ३५ टक्के आहे. त्यांच्या विरोधातल्या मतदानाची टक्केवारी ही ६५ टक्के आहे. मतदान ३८ पक्षांमध्ये विभागले गेलेले असून या सर्वांनी एकत्र येऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढावे लागेल,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बांगलादेशचे दरडोई उत्पन्न अधिक

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारताचे दरडोई उत्पन्न 2470 डॉलर इतके आहे, तर चीनचे दरडोई उत्पन्न हे 12970 डॉलर इतके आहे, तर अमेरिकेचे दर उत्पन्न हे 76 हजार डॉलर इतके आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबत बांगलादेश देखील भारतापेक्षा पुढे आहे. बांगलादेशचे दरडोई उत्पन्न हे 2730 डॉलर इतके आहे. त्यामुळे मोदींनी निर्माण केलेल्या आर्थिक गोष्टी भ्रामक असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.

भारत चीनलाही मागे टाकेल

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्याचा एकूण विकासदर पाहता तो केवळ सात टक्के इतका असून चीनच्या दरडोई उत्पन्न बरोबर जाण्यास आणखी वीस वर्ष लागतील. युनोच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारताची लोकसंख्या ही 142 कोटी इतकी झाली असून 14 एप्रिल 2023 पर्यंत भारत चीनलाही पाठीमागे टाकत जगात लोकसंख्येत नंबर एकचा देश राहील अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.