एसटी चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करणारा संदीप अर्जुन लहाने याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

औरंगाबाद,७ मार्च / प्रतिनिधी :- डेपोत बस लावण्‍यासाठी जाणाऱ्या  एसटी चालकाला जालन्याला नेवून सोड म्हणत शिवीगाळ करुन मारहाण करणारा संदीप अर्जुन लहाने याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड तदर्थ जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.डी. लोखंडे यांनी सोमवारी दि.७ मार्च रोजी ठोठावली.

या प्रकरणात एसटीचे चालक राजाराम तुकाराम गिते (४०, रा. जे सेक्टर मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २० एप्रिल २०१५ रोजी रात्री साडेदहा वाजेच्‍यासुमारस फिर्यादी हे बस (क्रं; एमएच-१४-बीटी-२४९२) ही आगारात लावणार असतांना बस मध्‍ये आरोपी संदीप लहाने हा चढला. त्‍यावर फिर्यादीने बस डेपोत लावायची आहे, तुम्ही खाली उतरा असे आरोपी लहाने याला सांगितले. मात्र चिडलेल्या लहाने याने फिर्यादीला शिवीगाळ करुन मला जालन्‍याला जायचे आहे, तु जात नाही असे म्हणत मारहाण करु लागाला, त्‍यावर फिर्यादीने त्‍याला समजावुन सांगण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र आरोपीने काही एक न ऐकता फिर्यादीची गच्‍ची धरुन मारहाण केली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी संदीप लहाने याला दोषी ठरवून भादंवी कलम ५०४ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त करावासाची शिक्षा न्‍यायालयाने ठोठावली.