मोदी आडनावावरून मानहानी खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा

जामीन मंजूर; उच्च न्यायालयात अर्ज करण्यास शिक्षा ३० दिवस निलंबित

सत्य हाच माझा धर्म-राहुल गांधी

राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू- खरगे

राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर-प्रियांका गांधी

‘राहुल गांधी, माफी मागा’ विधानसभेत आशिष शेलारांनी केली मागणी; सभागृहात गदारोळ

अहमदाबाद/सूरत, २३ मार्च/प्रतिनिधीः मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्यावर झालेल्या मानहानी खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत येथील न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

गुरुवारी दिलेल्या या निवाड्याविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज देता यावा यासाठी शिक्षेला न्यायालयाने ३० दिवस निलंबित केले. वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा उल्लेख करून सगळ्या चोरांची नावे मोदी कशी? असे विचारले होते.

सूरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सकाळी ११ वाजता गांधींना दोषी ठरवून वरील तुरूंगवासाची शिक्षा सुनावली तेव्हा गांधी न्यायालयात हजर होते. तुम्हाला काही म्हणायचे आहे का, असे न्यायालयाने विचारल्यावर गांधी म्हणाले की, मी नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो. मी कोणाविरुद्ध हेतूतः बोललेलो नाही. त्यामुळे कोणाचे नुकसान झालेले नाही.

दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा


राहुल गांधी याचा वकील त्यांच्या जामिनासाठी अर्ज देईल, असे समजते. न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.मानहानीच्या या खटल्यात राहुल गांधी यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे कलम ५०४ अन्वये दोषी ठरवले. गांधी यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम ४९९ आणि ५०४ अन्वये दोषी ठरल्यास दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षेची तरतूद आहे.

भीत्तीपत्रकांनी स्वागत

राहुल गांधी सूरतला येताच विमानतळाबाहेर त्यांचे स्वागत भीत्तीपत्रकांनी करण्यात आले. सूरत विमानतळावर संरक्षणात त्यांना बाहेर काढण्यात येऊन आठव्या न्यायालयाकडे रवाना करण्यात आले. गांधी यांच्या स्वागतासाठी सूरतमध्ये काँग्रेसने मोठी तयारी केली होती. राहुल गांधी विमानतळाबाहेर पडल्यावर त्यांचे स्वागत स्वागत शेर-ए-हिन्दुस्तानच्या भीत्तीपत्रकांनी केले गेले. काही भीत्तीपत्रकावर काँग्रेस वाकणार नाही, असे लिहिले होते. सूरतच्या एस. के. नगर पॉईंट, एसव्हीएनआयटी कॉलेज, पूजा-अभिषेक अपार्टमेंटवर मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते स्वागतासाठी हजर होते.

याच खटल्यात गांधी ९ जुलै, २०२० रोजी न्यायालयात हजर झाले होते.

प्रकरण आहे काय?

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील कोलारमध्ये सगळ्या चोरांची आडनावे मोदी कशी काय? असे म्हटले होते. या वक्तव्यावर सूरतचे (पश्चिम) भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला. मोदी म्हणाले होते की, राहुल गांधी यांनी मोदी समुदायाचा अपमान केला आहे. नंतर हा खटला सूरतच्या न्यायालयात गेला. गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी खटल्याचा निकाल लवकर मिळावा यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सूरतच्या न्यायालयाला वेगाने सुनावणी करण्याचा आदेश दिला. गेल्या एक महिन्यापासून सूरत न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजुंनी युक्तिवाद करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वकिलाने मोदी कोणता समुदाय नाही. राहुल गांधी यांचे सगळे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलेले होते. त्यामुळे मानहानीचा खटला तर त्यांनी (नरेंद्र मोदी) करायला हवा होता, असे म्हटले होते. यानंतर सूरत न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी निवाडा सुनावण्यासाठी २३ मार्च निश्चित केली होती.

सत्य हाच माझा धर्म-राहुल गांधी

मोदी आडनावाचा उल्लेख अशिष्टरित्या केल्याबद्दलच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रथम प्रतिक्रिया देताना सत्य हाच माझा धर्म असल्याचे म्हटले.

महात्मा गांधी यांचा हवाला देत राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “माझा धर्म हा सत्य आणि अहिंसेवर आधारलेला असून सत्य माझा देव आहे आणि त्याला गाठण्यासाठी अहिंसा हा मार्ग आहे.” राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी वडरा यांनीही हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये राहुल गांधींचा आवाज दडपून टाकण्यासाठी सगळ्या प्रकारेच उपाय योजले जात आहेत. परंतु, माझा भाऊ हा कधीही घाबरलेला नाही. आम्ही सत्य बोलून जगलो आहोत आणि नेहमी सत्य बोलू व देशासाठी आवाज उठवत राहू, असे म्हटले.

राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू- खरगे

नवी दिल्ली,२३ मार्च/प्रतिनिधीः मोदी आडनावाचा उल्लेख अशिष्टरित्या केल्याच्या खटल्यात राहुल गांधी यांना झालेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले जाईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिककार्जुन खरगे यांनी गुरुवारी येथे म्हटले.

हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये खरगे म्हणाले की, “भ्याड, हुकुमशाही भाजप सरकारचे वाईट व्यवहार राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी उघडकीस आणून त्यांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी केल्यामुळे सरकार जेरीस आले आहे. मोदी सरकार राजकीयदृष्ट्या दिवाळखोरीत निघाले असून ते सक्तवसुली संचालनालय (ईडी), पोलिस पाठवते व भाषणांबद्दल गुन्हे दाखल करते. आम्ही वरिष्ठ न्यायालयात अपील करू.”

वर्ष २०१९ मधील भाषणाबद्दल राहुल गांधी यांना सूरत जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी फौजदारी बदनामीबद्दल दोन वर्षे तुरूंगवास आणि १५ हजार रूपये दंड ठोठावला. गांधीविरुद्ध भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी गुन्हा दाखल केला होता. सगळ्या चोरांची आडनावे मोदी कशी असतात? असा प्रश्न गांधी यांनी प्रचारसभेत विचारला होता.

राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर-प्रियांका गांधी

नवी दिल्ली,२३ मार्च/प्रतिनिधीः सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी २ वर्षांची शिक्षा सुनावली. यावरून आता त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया ट्विट केली आहे. त्या म्हणाल्या की, “घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर करण्यात येतो आहे. असे असले तरी माझा भाऊ ना कधी घराला आहे, ना कधी घाबरणार आहे.” असे ट्विट केले आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींना घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी माझा भाऊ ना कधी घाबरला आहे, ना कधी घाबरणार आहे. सत्य बोलण्यासाठी जगतो आणि कायम सत्य बोलतच राहू, देशासाठी आम्ही आवाज उठवत राहू, सत्याची ताकद आणि करोडो भारतीयांचे आशीर्वाद त्याच्या सोबत आहे.”

‘राहुल गांधी, माफी मागा’ विधानसभेत आशिष शेलारांनी केली मागणी; सभागृहात गदारोळ

मुंबई,२३ मार्च  /प्रतिनिधी :-सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांना जामीनही मिळाला. मानहानीचा प्रकरणामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. हा मुद्दा आज विधानसभेतही चांगलाच गाजला. आधी सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या. त्यांनतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी, ‘राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी’ अशी मागणी केली. यावेळी आक्रमक झालेल्या आशिष शेलारांनी काँग्रेसवरदेखील टीका केली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली.

राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेतही उमटले. राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील विधानामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी काँग्रेसकडूनही उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा गदारोळ रोखण्याचा प्रयत्न केला. पण, सत्ताधारी आमदार ना थांबल्याने अध्यक्षांना १० मिनिटांसाठी विधानसभा स्थगित करावी लागली.

भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांनी जाहीरपणे माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राहुल गांधींविरोधात ठराव मांडण्याची परवानगीदेखील त्यांनी यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे मागितली. यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली.