जातीवाचक शिवीगाळ प्रकरण ; आरोपी जयश्री बोरणारे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

वैजापूर ,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शिवसेना आ.रमेश बोरणारे यांच्या स्वीय सहाय्यकाला सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक  शिवीगाळ करणाऱ्या महिला आरोपी जयश्री दिलीप बोरणारे (रा.सटाणा ता.वैजापूर) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश एम.ए मोहियुद्दीन यांनी गुरुवारी फेटाळला.

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील रहिवासी रामदास वाघ हे आ.बोरणारे यांच्याकडे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.18 फेब्रुवारी रोजी शहरातील गोदावरी कॉलनीत वर्षश्राद्धच्या कार्यक्रमात आरोपी जयश्री बोरणारे ही आ.रमेश बोरनारे यांच्या पत्नी संगीता बोरणारे यांना भांडणात शिवीगाळ करत होती. त्या दरम्यान स्वीय सहाय्यक वाघ यांनी जयश्री बोरनारे हिला शिवीगाळ करु नको असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जयश्री हिने स्वीय सहाय्यक वाघ यांना जातिवाचक अपशब्द वापरुन सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले. या प्रकरणी जयश्री दिलीप बोरनारे यांच्या विरोधात वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वैजापूर पोलिसात अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी जयश्री बोरनारे ह्या फरार आहेत. पोलीस तिचा ठावठिकाणा शोधत आहे. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तिने वकीलामार्फत वैजापूरचे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.जिल्हा न्यायाधीश एम.ए.मोईनुद्दीन यांच्यासमोर सुनावणीत सरकार पक्षाचे अभियोक्ता नानासाहेब जगताप यांनी अँट्रोसिटी अँक्ट मध्ये अटकपूर्व जामीन देण्याची तरतूद नसल्याचे सांगितले.गुन्हा नोंदवल्या नंतर आरोपी फरार झाली आहे.पोलीसांना तपास कामात सहकार्य करत नसल्याचा युक्तीवाद केला.

पोलीसाचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एम.ए.मोहियुद्दीन यांनी आरोपी जयश्री बोरणारे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.सुनावणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, तक्रारदार रामदास वाघ , पोलीस हवालदार धनंजय भावे यांची उपस्थिती होती. न्यायालयाकडून महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपीवर पोलीसाकडून अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे