वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून भरपाई द्या – कृषी मंत्र्यांचे आदेश

आमदार रमेश  बोरनारे यांचा पाठपुरावा

वैजापूर,​९​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरिप पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून नुकसान भरपाई द्या. असे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. दरम्यान आमदार रमेश बोरनारे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्र्याना पत्र देऊन सत्यपरिस्थिती कथन केल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

तालुक्यातील बाधित गावांबाबत प्रशासनात अजूनही संभ्रम असून प्रशासनाने तालुक्यात 14 गावे तर आमदारांनी 30 गावे गारपीटीच्या तडाख्यात सापडल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने नुकसानीसाठी केवळ गारपीट हाच एकमेव निकष लावल्याने अन्य शेतकऱ्यांना मात्र मदतीपासून वंचित राहवे लागणार आहे.    3 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यात झालेला वादळी पावसासह गारपिटीमुळे खरिप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. बहुतांश ठिकाणी पावासापेक्षा वादळाच्या चपाट्यात सापडून पिके भुईसपाट झाली. गारपीट व वादळामुळे 40 पेक्षा अधिक गावातील पिकांना कमी – अधिक प्रमाणात  तडाखा बसल्याच  समोर आले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आमदार रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री अब्दुल सत्तार या दोघांनाही लेखी पत्र देऊन वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे उसासह सोयाबीन, कापूस, मका, तूर आदी पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसान झाले आहे. शेतीपिक हाच त्यांचा मुख्य स्त्रोत असून नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडून उत्पन्नापासून ते वंचित राहणार आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी. असे बोरनारे यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या पत्रानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयातून पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी औरंगाबाद येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन कळविले आहे की, वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिके बाधित झाली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत ही माहिती संबंधित कंपनीस देण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावे. यासंदर्भात लवकरात लवकर दक्षता घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आवटे यांनी दिले आहेत. दरम्यान आमदार रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्र्याना पत्र दिल्यानंतर शासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु असे असले प्रशासनाने नुकसानभरपाईसाठी ज्या गावांमध्ये गारपीट झाली. तेच शेतकरी भरपाईसाठी पात्र राहणार आहेत. या निकषांमध्ये शिथिलता देऊन जिथे खरोखरच नुकसान झाले आहे. त्यांच्या पदरी मदत पडायला हवी. अशी रास्त अपेक्षा बाधित शेतकऱ्यांची आहे.  प्रशासनाच्या कडक निकषामुळे शेतकऱ्यांना मात्र धाय मोकळून रडण्याची वेळ आली आहे.  त्यामुळे अन्य बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहवे लागणार आहे. एवढे मात्र नक्की. 
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे तालुक्यातील 30 गावे बाधित झाली आहे. प्रशासनाने 14 गावांतील तीन हजार 480 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित असल्याचा अहवाल सादर केला आहे. परंतु हा आकडा अधिक आहे. नुकसानीबाबत निकष कडक असल्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून निकष शिथिल करण्याचा प्रयत्न करणार आहे. 
– रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर