वैजापूर तालुक्यातील लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करा -विशाल शेळके

वाकला येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करा

वैजापूर ,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लोणी(खु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे व वाकला येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.   

निवेदनात म्हटले आहे की, वैजापूर तालुक्यातील लोणी(खु.) हे बाजारपेठेचे मोठे गाव असून या गावास जवळपास 40 ते 50 गाव जोडलेले आहे. सदरील लोणी(खु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतरीत करणे आवश्यक आहे. तसेच मौजे वाकला हे 8 ते 9 हजार लोकसंख्येचे मोठे गाव असून बाजारपेठ ही आहे. 10 ते 12 खेडे  या गावाला जोडले आहे.वाकला येथे आरोग्य सुविधा नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आरोग्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाकला येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे.                         

 लोणी (खु.) येथे नवीन ग्रामीण रुग्णालय तसेच वाकला येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करावे म्हणून आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरवठा चालू असल्याचे श्री. शेळके यांनी सांगितले