कृषिसेवा केंद्राचे दुकान फोडून 9 लाखांची चोरी ; वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथील घटना

वैजापूर ,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथील कृषीसेवा केंद्राच्या टॉवरचा कडी-कोयंडा तोडून गल्ल्यातील रोख 9 लाख रुपयांसह चांदीचे शिक्के व अन्य साहित्य असा एकूण 9 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मंगळवारी रात्री पळविला.

घराचे बांधकाम सुरु असल्याने कृषी सेवा केंद्रचालकाने सुरक्षित जागेवर ठेवलेली रकम चोरट्यांनी लंपास केली. या चोरीमुळे आसपासच्या गावातील व्यापारी व शेतक-यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

तालुक्यातील सवंदगाव येथे कापसाचे व्यापारी विजय कदम यांचे श्रीराम अग्रो कृषी सर्विसेस नावाचे दुकान आहे. कदम हे गावात कापूस खरेदी रोख स्वरुपात करत असल्याने त्यांच्याकडे नेहमीच मोठी रक्कम राहते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने ते परिवारासह शेतवस्तीवर बांधलेल्या कांदा चाळीत तात्पुरते स्थलांतरीत झाले आहे. व्यापाराची मोठी रक्कम चाळीत ठेवणे सुरक्षित नसल्याने व रोजच्या व्यवहारासाठी पैसे लागत असल्याने दुकानातील टेबलच्या तिन्ही ड्रॉवरमध्ये ते पैसे ठेवायचे. कदम यांनी दोन दिवसापूर्वी एकाकडून कापसाचे 7 लाख 20 हजार 720 रुपयांची रोकड आणली होती. मंगळवारी रात्री दुकान बंद करण्यापूर्वी 9 लाख रुपये रोख व अन्य साहित्य ड्रॉवरमध्ये ठेवून ते नेहमीप्रमाणे घरी गेले. त्यावेळी रात्री 12 .15 वाजेला त्यांना गावातील अविनाश सूर्यवंशी यांनी फोनवरून तुमच्या दुकानावरून खाली उतरत असून एकजण खाली उभा आहे. त्यांना आवाज दिल्यावर ते पळून गेल्याचे सांगितले. त्यामुळे विजय कदम यांनी दोघा भावांसह गावात धावून घेवून दुकान गाठले. विजय यांनी दुकान उघडून आत जावून बघितले असता टॉवरचा दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी ड्रोवर तपासले असता त्यात ठेवलेले 9 लाख रुपये नसल्याचे आढळून आले.

चोरट्यांनी जिन्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख 9 लाख रुपये व 4 हजार रुपयांचे चांदीचे 7 शिक्के, बँक पासबुक, एटीएम कार्ड असा एकूण एकूण 9 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज पळविला. कदम यांनी चोरीची माहिती वैजापूर पोलिसांना कळविली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक आर.एन.घाडगे, रज्जाक शेख, संजय घुगे, प्रशांत गिते, विजय भोतकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तर बुधवारी सकाळी श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. अंगुलीनिर्देश पथकाने घटनास्थळाहून बोटांच्या ठशांचे नमुने घेतले आहे. या प्रकरणी विजय विठ्ठल कदम रा.सवंदगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.