धूत ट्रान्समिशनचा आरोग्य आणि तंदुरूस्ती क्षेत्रात ‘बर्ज इलेक्ट्रॉनिक्स’ उपक्रमाद्वारे प्रवेश

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (डीटीपीएल), या सहा देशांमध्ये उपस्थिती असलेल्या वाहन उद्योगांसाठी सुटे घटकांच्या निर्मितीतील जागतिक कंपनीने बर्ज इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे. वेगाने वाढ होत असलेल्या आरोग्य आणि तंदुरूस्ती उद्योगात उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी विविधीकरण योजनेच्या आराखड्यानुसार हा उपक्रम कंपनीने सुरू केला आहे.

बर्ज इलेक्ट्रॉनिक्स, ज्याचा अर्थ जर्मन भाषेत हमीदार असा आहे, खऱ्या अर्थाने निरोगी जीवनशैलीच्या सुकरतेसाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य आणि तंदुरूस्ती उत्पादनांची मालिका सादर करेल. उत्पादन विकास, निर्मिती आणि वितरणातील डीटीपीएलच्या दोन दशकांहून अधिक कालावधीच्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर, सुरक्षित, परवडणारी, प्रगत आणि नाविन्यपूर्ण उपायांसह आरोग्य आणि तंदुरूस्ती उद्योगात नवीन अध्याय सुरू करण्याचे बर्ज इलेक्ट्रॉनिक्सचे उद्दिष्ट आहे.

Message From Managing Director – Welcome to Dhoot Transmission Pvt. Ltd.
Rahul Dhoot ,MD Dhoot Transmission

धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत म्हणाले, “बर्ज इलेक्ट्रॉनिक्सचा शुभारंभ हा गंभीर साथीच्या आजाराशी झुंज देत असलेल्या समाजातील आरोग्य आणि तंदुरूस्तीला समृद्ध करण्याच्या आमच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. विविध नाविन्यपूर्ण जागतिक श्रेणीचे उत्पादन आणि विपणन करून, आरोग्य आणि तंदुरूस्ती उपयोजनांचा दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट बर्ज इलेक्ट्रॉनिक्स ठेवते. सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाबाबतच्या आमच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार यातून केला गेला आहे. मेक इन इंडिया आणि मार्केट टू द वर्ल्ड, ही उद्दिष्टे आमच्या पुढील प्रवासाला अर्थात आरोग्य आणि तंदुरूस्ती उद्योगात भक्कम उपस्थिती असलेली वैविध्यपूर्ण बहुराष्ट्रीय कंपनी बनण्याच्या वाटचालीला प्रेरणा देत राहतील.”

बर्ज इलेक्ट्रॉनिक्स लवकरच त्याचे पहिले उत्पादन, आयन डोम, हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) अधिस्वीकृती असलेले आणि आयएलएसी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारे मंजूर आणि चाचणी केलेले विषाणूंना निष्प्रभ करणारे उपकरण बाजारात आणेल. अद्वितीय वायु शुद्धीकरण तंत्रज्ञानासह सुसज्ज, आयन डोम हे आयनाइझरसह येते आणि घर, कार्यालय, केबिन, उपाहारगृह, जिम, शाळा-महाविद्यालयाचे वर्ग यांसारख्या बंदिस्त जागांमधील हवा निर्जंतुक करते. ज्या वेळी देशात करोनाच्या वेगवेगळ्या विषाणूंच्या प्रकारांचा वेगाने प्रसार होत आहे अशा वेळी दाखल झालेले आयन डोम हे बंदिस्त जागा सुरक्षित करून, ग्राहकांना मोकळा श्वास घेण्यास उपकारक ठरेल.

साथीच्या लाटांमुळे लोकांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि निरोगीपणा बद्दल जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) च्या मते, भारताचा निरोगी तंदुरूस्त आरोग्य बाजारपेठेचे आकारमान हे ४९० अब्ज रुपये इतके आहे. ही बाजारपेठ येत्या काही वर्षात घातांकीय पद्धतीने वाढीकडे अग्रेसर असताना, बर्ज इलेक्ट्रॉनिक्सचे ध्येय हे बाजारपेठेत वेगळेपणाची दमदार छाप निर्माण करण्याचे आहे. पुढे जाऊन, कंपनी कार व्हायरस न्यूट्रलायझर, अँटी-एजिंग फेस मास्क, हायड्रोजन वॉटर यांसारखी अधिक तांत्रिक आणि स्वदेशात विकसित आरोग्य उत्पादने प्रस्तुत करणार आहे.

बर्ज इलेक्ट्रॉनिक्सबद्दल सारांशात :

बर्ज इलेक्ट्रॉनिक्स हा धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचा (डीटीपीएल), उत्कृष्ट आरोग्य आणि निरोगी स्वच्छता उत्पादने प्रस्तुत करून लोकांना निरोगी जीवनशैलीसह सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवलेला नवीन उद्यम उपक्रम आहे. उत्पादन विकास, निर्मिती आणि वितरणातील डीटीपीएलच्या दोन दशकांहून अधिक कालावधीच्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर, सुरक्षित, परवडणारी, प्रगत आणि नाविन्यपूर्ण उपायांसह आरोग्य आणि तंदुरूस्ती उद्योगात नवीन अध्याय सुरू करण्याचे बर्ज इलेक्ट्रॉनिक्सचे उद्दिष्ट आहे. औरंगाबाद, महाराष्ट्र येथे स्थित, बर्ज इलेक्ट्रॉनिक्स ही जागतिक दर्जाची स्वदेशात विकसित आरोग्य आणि तंदुरूस्ती उत्पादने जसे की कार व्हायरस न्यूट्रलायझर, अँटी-एजिंग फेस मास्क, हायड्रोजन वॉटर इत्यादींची श्रेणी बाजारात आणणार आहे. त्यांचे पहिले उत्पादन, आयन डोम, हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) अधिस्वीकृती असलेले आयन डोम हे घर, कार्यालय, केबिन, उपाहारगृह, जिम, शाळा-महाविद्यालयाचे वर्ग यांसारख्या बंदिस्त जागांमधील हवेतील विषाणूंना निष्प्रभ करणारे अद्वितीय वायु शुद्धीकरण तंत्रज्ञानासह सुसज्ज उपकरण आहे.