अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना धडक, अपघातात एक जण जागीच ठार

वैजापूर ,४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार व चार जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री वैजापूर शहरापासुन सहा किमी अंतरावर नांदगाव शिवारात घडला. कालू मदन किराडे (वय १९, रा.बनियार, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. कैलास शिसोदिया (३५, मध्यप्रदेश), गोरखलाल गोरेलाल (४५, मध्यप्रदेश), मिजबा आसीफ (१३), आसीफ शेख चॉद (३६), दोघे रा.रास्ते सुरेगाव (ता. येवला) अशी जखमींची नावे आहेत.

जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. यशपाल चंदे व डॉ. पाटील यांनी जखमींवर उपचार केले. डॉक्टरांनी कालु किराडे यास तपासुन मृत घोषित केले. कालु किराडे हा रोजगारासाठी कुटुंबियांसह मध्यप्रदेशमधुन आला असून शहरात सुरु असलेल्या एका गृहप्रकल्पावर तो कामास होता. वैजापुरकडे दुचाकीवर येत असतांना अन्य एक दुचाकीलाही अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील एक जण जागीच ठार व अन्य चौघे जखमी झाले. गोरेगाव, मिजबा व आसिफ या तिघांच्या पायाला अपघातात फ्रॅक्चर झाले असुन पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कैलास शिसोदिया यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल किसन गवळी व पोलिस नाईक गणेश पठारे यांनी घटनास्थळी भेट दिली.