असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत

मेरठ ,४ फेब्रुवारी :- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गुरुवारी दोन जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन्ही आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांच्या चौकशीत त्यांनी या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे. सचिन आणि शुभम अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करुन दिल्लीला परतत असताना पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे सोडून पळून गेले. या हल्ल्यानंतर ओवेसींनी स्वतः आपण सुरक्षित असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले.

दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे. आरोपी ओवेसींच्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी संतापले होते. यामुळेच त्यांनी ओवेसींवर हल्ला करण्याचा कट रचला. कितापूर, मेरठ येथून प्रचार आटोपून दिल्लीला परतत असताना छाजरसी टोल प्लाझाजवळ या दोघांनी ओवेसींच्या वाहनावर गोळीबार केला, असे हापूरचे एसपी दीपक भुकर यांनी सांगितले.

फोनवरुन रचला कट आणि टोलनाक्यावर हल्ला

 एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ल्या करण्याचा सुनियोजित कट रचला होता, असं तपासात समोर आलं आहे.

दोन्ही हल्लेखोर तरुण आधीपासूनच घटनास्थळावर उभे होते. ओवेसींचा ताफा टोल प्लाझाजवळ पोहोचताच ते जवळ आले. वाहनांचा वेग कमी होताच त्यांनी ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केला. दोघांनी कारच्या खालच्या दिशेने गोळी झाडल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. हल्ल्यासाठी ओवेसी येण्याच्या दीड तास आधी ते पोहोचले होते. ओवेसी यांचा चालक यामीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आधी वाटलं स्फोट झाला, नंतर कळलं गोळीबार झाला
घटनास्थळावरून निघाल्यावर ओवेसी यांनी एएसपींना फोन केला. त्यांना संपूर्ण घटना सांगितली. आधी जवळच स्फोट झाल्याचं त्यांना वाटलं, पण दुसरी गोळी झाडण्यात आली तेव्हा कारवर गोळीबार होत असल्याचं लक्षात आलं, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर ट्विट करुन ओवेसी यांनी घटनेची माहिती दिली.

फेसबूकवर मैत्री, फोनवरुन रचला कट
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकाच नाव सचिन तर दुसऱ्याचं नाव शुभम आहे. या दोघांची मैत्री फेसबूकवर झाली. त्यानंतर फोनवर त्यांचं बोलणं वाढत गेलं. फोनवरच दोघांनी हल्ल्याचा कट रचला. मित्रांकडून त्यांनी बंदूका घेतल्या. त्यानंतर हल्ल्याच्या दिवशी ते भेटले आणि कारने टोलनाक्यावर पोहचले. 

‘आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही’
पोलिस चौकशीत सचिन आणि शुभम यांनी आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचं सांगितलं. असदुद्दीन ओवेसी यांच्यापेक्षा जास्त नाराजी त्यांचे भाऊ अकबरुद्दीन यांच्यावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ओवेसी यांच्या भावाने दिलेल्या भाषणातील एक मुद्दा वादग्रस्त होता. पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवून देऊ असं या भाषणात उल्लेख केला होता. या वक्तव्याचा या दोघांना राग होता. त्यानंतर खूप ते दिवसांपासून हल्ला करण्याचा विचार करत होते. त्यांचा उद्देश ओवेसींना मारण्याचा नव्हता, तर द्वेषाचे राजकारण सोडून द्या, असा संदेश देण्याचा होता. ओवेसी यांना कोणतीही इजा करण्याचा उद्देश नव्हता, त्यामुळे कारच्या खालच्या भागात गोळी झाडण्यात आली, असं हल्लेखोरांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

योगी नेमकं काय म्हणाले?

“आम्ही मतपत्रिकेवर विश्वास ठेवतो. बुलेटवर आमचा विश्वास नाही. आम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही हिंसक घटनेचा स्वीकार करु शकत नाही. ओवेसींसोबत आमचे कदाचित वैचारिक मतभेद असू शकतात. पण कुणाच्याही सुरक्षा व्यवस्थेसोबत खेळ खंडोबा करण्याची परवानगी अजिबात दिली जाऊ शकत नाही”, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी मांडली. “मी विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन करतो की, मंचावरुन भाषण करताना जनभावनेचा विचार करा. कारण कुठेतरी क्रियाला प्रतिक्रिया मिळण्याच्या घटना दिसू शकतात”, असं योगी म्हणाले.

ओवेसींना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. ओवेसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. ‘१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”, असे ओवेसी म्हणाले होते.