अल्पवयीन मुलीला खोलीत डांबुन ठेवणाऱ्या तरुणाला अटक

औरंगाबाद,३० जानेवारी / प्रतिनिधी :-  प्रेमाच्‍या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीला मुंबईला पळुन जाऊ असे आमिष दाखवून तिला तब्बल १२ तास एका रसवंती गृहातील खोलीत डांबुन ठेवणाऱ्या  तरुणाला जवाहरनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. आरोपीला एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश तदर्थ जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एम. सुंदाळे यांनी रविवारी दि.३० दिले. नंदकिशोर संजय कोलते (१९, रा. क्षीरसागर ता. भोकरदन जि. जालना, ह.मु. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या  प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानूसार, २४ जानेवारी रोजी पीडीता सकाळी पावणे दहा वाजेच्‍या सुमारास केक बनविण्‍याच्‍या क्लासला जाते असे सांगुन घरा बाहेर पडली होती. दुपारी १२ वाजेच्‍या सुमारास केक क्लास चालक महिलेने फिर्यादीला फोन करुन पीडिता क्लासला आली नसल्याची माहिती दिली. फिर्यादी व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी पीडितेचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. रात्री फिर्यादी या तक्रार दाखल करण्‍यासाठी पोलीस ठाण्‍यात आल्या असता, त्‍यांच्‍या बहिणीने फोन करुन पीडिता घरी आल्याची माहिती दिली.

फिर्यादीने घरी जावून पीडितेला जाब विचारला, त्‍यावेळी पीडितेने सांगितले की, पीडिता ही नेहमी जवाहर कॉलनी येथील रसवंतीवर जात होती. ४ जानेवारी रोजी तिची ओळख आरोपी नंदकिशोर याच्‍याशी झाली. त्‍यांनतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्‍यानंतर ते चार-पाच वेळेस रसवंतीवर भेटले. २३ जानेवारी रोजी नंदकिशोरने पीडितेला मुंबईला पळून जाण्‍याचे आमिष दाखवले. पीडितेने देखील त्‍याला होकार दिला. २४ जानेवारी पीडिता ठरल्याप्रमाणे रसवंतीवर गेली. आरोपीने तिला रसवंतीतील एका रुमवर थांबायला सांगितले. पीडिता ही सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत त्‍या रुममध्‍ये बसुन होती. रात्री पीडितेने रुमच्‍याबाहेर पडण्‍याचा प्रयत्‍न केला असता आरोपीने तिचा हाथ धरुन तिला पुन्‍हा रुममध्‍ये बसवले. पीडिता रडायला लागल्‍याने आरोपीचा मित्र लखन याने पीडितेला घरी सोडून येण्‍यास सांगितले. त्‍यानंतर नंदकिशोर याने पीडितेला दुचाकीवर बीड बायपास रोडवरील एका हॉटेलात जेवायला नेले. तेथून पीडितेला त्‍याने घराजवळ आणुन सोडले. या  प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी जप्‍त करायची आहे. आरोपी पीडितेला मुंबईला कोठे पळवून नेणार होता याचा तपास करायचा आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचातपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.