येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी,औरंगाबाद शहरात मात्र शाळा बंदच

कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश

१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई ,२० जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळा सोमवार दि. 24 जानेवारीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना कोविड-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

औरंगाबाद शहरात कोविडची प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गांत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यासाठी मनपा 8 दिवसांनंतर निर्णय घेईल. शाळा आधीच उघडल्या आहेत आणि कार्यरत आहेत असे औरंगाबाद पालिकेतर्फे सांगण्यात आले.

राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तथापि कोणाचेही शिक्षण थांबू नये हा प्रयत्न असल्याचे प्रा.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

शाळा सुरू करताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.