रासायनिक खतांची विक्री ऑनलाईन करावी – प्रकाश देशमुख

खुलताबाद येथे कृषि निविष्ठा विक्रेत्यांची बैठक

खुलताबाद ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- विक्रेत्यांनी  रासायनिक खतांची विक्री रिअल टाईम बेसीसवर आँनलाईन करावी,खतांची विक्री करताना शेतकर्‍याचे पेरणी क्षेत्र व आवश्यक खत मात्रा याची खात्री करुन याअनुषंगाने खत विक्री करावी, साठा नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात, ई पाँझ मशीन    ३.१व्हर्जन अद्यावत करावेत, शेतकरी ग्राहकांना डिजीटल पेमेंट सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले.

खुलताबाद पंचायत समीती सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषि विभागाच्या वतीने  तालुक्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख होते.

बैठकीच्या सुरवातीला तालुका कृषि निविष्ठा विक्रेता संघटनेच्या वतीने कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख,मोहीम अधिकारी दिपक गवळी, जिल्हा कृषि अधिकारी धम्मशिला भडीकर, तालुका कृषि अधिकारी शिरीष घनबहादुर व पंचायत समिती कृषि अधिकारी अशोक खेडकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

बैठकीमध्ये विक्रेत्यांनी  रासायनिक खतांची विक्री रिअल टाईम बेसीसवर आँनलाईन करावी,खतांची विक्री करताना शेतकर्‍याचे पेरणी क्षेत्र व आवश्यक खत मात्रा याची खात्री करुन याअनुषंगाने खत विक्री करावी, साठा नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात, ई पाँझ मशीन    ३.१व्हर्जन अद्यावत करावेत, शेतकरी ग्राहकांना डिजीटल पेमेंट सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, किड व रोग नियंत्रणासाठी जास्तीत जास्त जैविक औषधिंचा वापर करण्याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, कापसावरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील लष्करी अळी नियंत्रणाबाबत शेतकर्‍यांना माहीती द्यावी,  उन्हाळी सोयाबीन  पिक घेण्याबाबत आग्रह धरावा  ,कापसाचे फरदड पिक घेण्यापासुन शेतकर्‍यांना परावृत करावे,खरीप हंगामातील बियाणे विक्रीचा अंतीम अहवाल व रब्बी हंगामात बियाणे विक्रीचा पंधरवाडी अहवाल विहीत प्रपत्रात सादर करावा याप्रमाणे सुचना देण्यात आल्या.
आरसीएफ कंपनी प्रतीनिधी गोरे यांनी  विक्रेत्यांना खतांच्या आँनलाईन विक्री व ई पाॅज मशीन हाताळताना येणार्‍या अडचनीबाबात शंकासमाधान केले तर बीएएसएफ किटकनाशक कंपनी प्रतीनिधी काळे यांनी किटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत माहीती दिली.
निविष्ठा विक्रेत्यांचे वतीने लक्ष्मण गुंजाळ यांनी निविष्ठांच्या नमुन्यांची रक्कम शासनाकडुन लवकर मिळावी तसेच परवाने वेळेवर नुतनीकरण करुन मिळण्याबाबत मागणी केली.कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीवेळी कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख, मोहीम अधिकारी दिपक गवळी ,जिल्हा कृषि अधिकारी धम्मशिला भडीकर,तालुका कृषि अधिकारी शिरीष घनबहादुर व पंचायत समिती कृषि अधिकारी अशोक खेडकर,कृषि विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पोपट दांडेकर, सचिव लक्ष्मण गुंजाळ व विक्रेते मोठ्या सख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  व आभार प्रदर्शन कृषि अधिकारी अशोक खेडकर यांनी केले.