राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान

जालना,१० जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यात कोरोनाबाधित  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण असून लॉकडाऊनची  शक्यता वर्तवली जात आहे. पण कोरोनाची तिसऱ्या लाटेला  आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील’ असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

आज राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला.’सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे’ असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असं आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असं म्हटलं आहे. राज्यातील अनेक राजकीय नेते करोना नियम आणि निर्बंधांचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावेत आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावेत असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, “राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचं आहे. आज आपण बघतो आहोत की काल ४५ हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? जसं दुसऱ्या लाटेत दररोज ६५ हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता. तसं या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असं वाटतं. त्यानंतर तो खाली जाईल असंही तज्ज्ञांचं मत आहे”.

May be an image of 10 people, people sitting, people standing and text that says "鳳"

आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यातील परिस्थितीवर काय बोलले 

कोवीड-19 पार्श्वभूमीवर आज जालना येथे आढावा बैठक पार पडली.संपुर्ण राज्यात कोव्हीड19 बाधितांची संख्या वाढत असुन जालना जिल्ह्यातही बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन कोव्हीड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे,जिल्ह्यातील डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरसह कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देत जे कोव्हीड केअर सेंटर बंद करण्यात आली असतील ती तातडीने सुरु करण्यात यावीत. या ठिकाणी नियमित स्वच्छता ठेवण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात औषधी व मनुष्यबळ उपलब्ध राहील याचीही दक्षता घेणे,जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्याच्या सूचना करत लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात येऊन चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करत जिल्ह्यात लसीकरणालाही अधिक गती देणे बाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, कोव्हीड19 बाबत असलेल्या शंका, लसीकरणाची माहिती, रुग्णवाहिका आदी असलेली माहिती क्षणात मिळावी यासाठी कॉलसेंटर तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले. तसेच गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना आरोग्य प्रशासनामार्फत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तसेच आरोग्यविषयक मदतीसाठी हेल्पलाईन आजपासुन सुरु करण्यात आली.