महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे कुटुंबासह रक्तदान

राज्यातील तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन
Image

तिवसा, दि. 28 : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपले वडील लोकनेते, माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांक्षासमवेत रक्तदान करून तरुणाईला रक्तदानासाठी पुढे येण्याचा संदेश दिला.

Image

लोकनेते, माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आज तिवसा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयात रक्तदान करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनेही स्वतः पुढे येऊन रक्तदान चळवळ वाढविण्याचे आवाहन मंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

गेल्या 9 वर्षांपासून माजी आमदार स्व. ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीच्या तिवसा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. आज यावेळी दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी वडिलांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांची मुलगी आकांक्षा व मुलगा यशवर्धन यांनीही रक्तदान केले.

गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्यानंतरही ही विधायक परंपरा त्यांच्या जयंतीनिमित्त पाळली जाते, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. रक्तदान शिबिराला दरवर्षी  प्रतिसाद वाढत आहे. मागील वर्षापासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करतो. रक्ताच्या नात्यातून  प्रेमाचे, बंधुतेचे नाते जुळविण्याचा हा प्रयत्न आहे.

रक्तदानाला प्राणदानाचे मोल आहे. ते श्रेष्ठ दान मानले जाते. रुग्णालये, दवाखाने, रक्तपेढ्या  येथे गरजूंसाठी पुरेसा साठा आवश्यक असतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी नियमित रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

Image

लोकनेते स्व. ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराबरोबरच भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेविकांचा सन्मान व सत्कार अशा अनेकविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

आमदार बळवंतराव वानखडे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे,  शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले,  सुधीर सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.