जालना ते पुणे व किसान रेल्वेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ

Image

जालना,२ जानेवारी /प्रतिनिधी:- जालना ते पुणे व किसान रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना रेल्वे स्टेशन येथे रेल्वेस हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

Image

याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, रेल्वेचे एजीएम अरुण जैन, डीएमआर भुपेंद्र सिंग आदींची उपस्थिती होती.

Image

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, जालन्यासह मराठवाड्यातून पुणे शहराकडे प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. प्रवाश्यांना केवळ बस व ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत होते. वाढत्या रहदारीमुळे सहा ते सात तास पुण्यासाठी नागरिकांना लागत होते. पुण्यासाठी रेल्वे व्हावी, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेता जालना ते थेट पुणे रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत असल्याचे सांगत जालन्यात पीट लाईन व्हावी, अशी मागणी असून तांत्रिक बाबी तपासून यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.

Image

किसान रेल्वेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा आसाम राज्यात या रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.

Image
Image

‘किसान रेल’ शेतकरी आणि व्यापार्‍यांना त्यांच्या कृषी मालाची जलद, निर्धोक, सुरक्षित आणि किफायतशीर रीतीने कमीत कमी खर्चा मध्ये अगदी दूरच्या स्थानापर्यंत विक्री करण्याची सुविधा देते. जेणेकरून क्षेत्रातील शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा विकास होईल व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल.

मराठवाड्यातील लोकांना गाडीची सोयीस्कर वेळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, नांदेड-हडपसर (पुणे) एक्स्प्रेसच्या वेळेत  बदल करण्यात आला आहे, असे यावेळी बोलताना रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले. नवीन एलएचबी रेल्वे डबे सुरक्षेसाठी, सीसीटीवीएस, रेल्वे माहिती प्रणाली इ.आधुनिक सुविधा प्रदान करतील. तसेच आज किसान रेल्वेलाही  हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही किसान रेल्वेसेवा  शेतकरी समुदायाला त्यांची  फळे, भाजीपाला इत्यादींची वाहतूक करण्यासाठी 50% वाहतूक सवलतीसह  देशातील प्रमुख बाजारपेठांशी कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

भारतीय रेल्वेने 1000 कोटी रुपये खर्चाच्या  मनमाड-औरंगाबाद विभागाच्या दुहेरीकरण सर्वेक्षण कार्याचा प्रारंभ केला आहे.पुढच्या टप्प्यात औरंगाबाद ते जालना आणि त्यापुढील रेल्वेमार्गाच्या  दुहेरीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.जालना रेल्वे स्थानकावर 100 कोटी रुपये खर्चाची  पिट लाईन तयार करण्याचा प्रस्ताव सक्रियरूपात  विचाराधीन आहे.

मराठवाडा विभागातील माल आणि पार्सल वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करून, पायाभूत सुविधा आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे.,असे दक्षिण मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए.के.जैन यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. मराठवाडा विभागातील महत्त्वाच्या स्थानकांसाठी सोयीची  वेळ असलेली ही नवीन एक्स्प्रेस गाडी  पुण्यातील शैक्षणिक केंद्र आणि औद्योगिक केंद्राला (हडपसर हे पुण्याचे उपनगर आहे) जोडते. तसेच, जालना येथून धावणारी पहिली किसान रेल्वे शेतकरी समुदायाला त्यांच्या कृषी उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन देण्यासाठी योग्य मदत करून शेतकऱ्यांच्या जीवनात  लक्षणीय  परिवर्तन घडवेल.

नवीन डबे जोडलेल्या आणि सुधारित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या नांदेड – हडपसर एक्स्प्रेसची ठळक वैशिष्ट्ये :

  • ही रेल्वेगाडी मराठवाडा आणि महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे  दरम्यान  थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करते आणि  मराठवाडा विभागातील सर्व प्रवाशांसाठी रेल्वेच्या सोयीच्या वेळा प्रदान करते.
  • अत्यंत आरामदायी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी गाडीला  अत्याधुनिक एलएचबी डबे जोडण्यात आले असून यामुळे  प्रवाशांना प्रवासाची नवी अनुभूती  मिळेल.

प्रवाशांना संरक्षित आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी या डब्यांच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत  त्यामुळे अनधिकृतपणे गाडीत चढणाऱ्या  प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धावत्या गाडीची  वास्तविक माहिती देण्यासाठी डब्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित स्पीकर बसवण्यात आले आहेत.मराठवाडा विभागात प्रथमच III वातानुकूलित  इकॉनॉमी श्रेणी  सुरू करण्यात आली आहे. ही श्रेणी  नियमित III वातानुकूलित  डब्यापेक्षा कमी किमतीत आरामदायी वातानुकूलित प्रवास प्रदान करेल.

जालना येथून सुटलेल्या  पहिल्या किसान रेल्वेची ठळक वैशिष्ट्ये:

आज, जालन्याहून सुटलेली पहिली किसान रेल्वे जालना स्थानक ते 2800 किलोमीटरहून जास्त अंतरावर असलेल्या आसाम राज्यातील जोरहाट टाउन रेल्वे स्थानकापर्यंत पर्यंत चालवली जात आहे. ही किसान रेल्वे जालना परिसरातील शेतकरी, व्यापारी, मालवाहतूदारांना  सुरक्षित, जलद आणि किफायतशीर वाहतूक आणि उत्तम बाजारभाव मिळवून देण्यास देखील मदत करेल.