अखेर वैजापूर-कन्नड तालुक्यातील ‘एचयुडीएस’च्या लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन रोहित्र मिळाले ; आ.बोरणारे – सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

वैजापूर ,२५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- ‘एक शेतकरी – एक डीपी’ योजनेअंतर्गत वैजापूर – कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या डीपी नादुरुस्त झाल्याने त्या दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीकडे जमा करून सहा महिन्यापेक्षा जास्त काळ होऊनही त्या दुरुस्त होऊन न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आ.रमेश पाटील बोरणारे व  युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील सोनवणे यांच्या प्रयत्नाने अखेर नवीन डीपी मिळाल्या आहेत.नवीन रोहित्र मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Displaying FB_IMG_1636802310205.jpg


वैजापूर व कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीकडून ‘एचयुडीएस’योजनेअंतर्गत  रोहित्र बसविण्यात आले होते. गुजरात मधील एका खासगी कंपनीमार्फत बसविण्यात आलेले हे रोहित्र एक-दोन महिन्यातच खराब झाल्यामुळे विहिरीत पाणी असतांनाही पिकांना पाणी देता येत नव्हते.शेतकऱ्यांना एचयुडीएस योजनेअंतर्गत मिळालेली वैयक्तिक डीपी (रोहित्र) नादुरुस्त झाल्यास अथवा जळाल्यास ती डीपी महावितरण कंपनी दुरुस्तीसाठी गुजरात मधील एका खासगी कंपनीकडे पाठवते. वैजापूर व कन्नड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जळालेल्या व नादुरुस्त झालेल्या डीपी महावितरण कंपनीच्या कार्यालयात जमा करूनही गेल्या सहा महिन्यापासून डीपी दुरुस्त होऊन मिळत नसल्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले होते. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत होते.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याकडे व्यथा मांडली.आ.बोरणारे यांनी वीज प्रश्ना संदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी नेहमीच तत्पर असलेले कन्नड येथील शिवसेना कार्यकर्ते तथा विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ सोनवणे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या डीपींचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सांगितले.सोनवणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून रोहित्र न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा महावितरणला दिला होता.त्याची दखल घेऊन महावितरणचे संचालक मंगेश गोंदवले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, कार्यकारी अभियंता संजय दौड यांनी आ.रमेश पाटील बोरणारे व युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील सोनवणे यांच्याबरोबर बैठक घेतली व रोहित्र दुरुस्त करून न देणाऱ्या गुजरात येथील कंपनीस काळया यादीत टाकून शेतकऱ्यांना नवीन रोहित्र देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.आ.बोरणारे व सोनवणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वैजापूर तालुक्यातील भगगांव, डागपिंपळगांव,कापुसवाडगांव,अलापूरवाडी, डोणगांव व लोणी येथील शेतकऱ्यांना सोमवारी महावितरणच्या कन्नड येथील कार्यालयातून नवीन रोहित्र देण्यात आले. विशेष म्हणजे वाढीव आकार व वीज बिलाची वसुली न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रोहित्र पोहचविण्यात आले.एक शिवसैनिक म्हणून निस्वार्थपणे शेतकऱ्यांचे काम पूर्ण केल्याचे समाधान वाटते असे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.