वैजापूर:सरपंचपदासाठी सर्व 155 अर्ज वैध तर सदस्यपदाचे 12 अर्ज छाननीत बाद

वैजापूर, ७ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी सोमवारी (ता.05) सरपंचपदासाठी दाखल झालेले सर्व 155 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 615 उमेदवारी अर्जापैकी 12 उमेदवारी अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले.

तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारी अर्जांची तहसील कार्यालयाच्या सभागृहात छाननी करण्यात आली. या छाननीत सदस्यपदाचे 12 अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी दिली.

या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी 155 व सदस्यपदासाठी 615 असे एकूण 770 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत सरपंचपदासाठी दाखल झालेले सर्वच म्हणजेच 155 अर्ज वैध ठरले तर सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 615 उमेदवारी अर्जांपैकी 12 अर्ज अवैध ठरले आहेत. महालगाव येथील सोनम संदीप आल्हाट, विश्वेश्वरी प्रकाश आल्हाट, पानवी बुद्रुक येथील देविदास पुंजाहरी गोरे, हनुमंतगाव येथील गौरव बाबुलाल भडके, नादी येथील पंडित नवनाथ भास्कर, सरस्वतीबाई रावसाहेब बर्डे, बेलगाव येथील संतोष हिरामण त्रिभुवन, अव्वलगाव येथील भारती अनिल मोरे, गोळवाडी येथील श्याम सुखदेव पवार, हिलालपूर येथील शोभा अशोक गायकवाड, पारळा येथील हिराबाई ज्ञानेश्वर घुगे व वांजरगाव येथील सय्यद यास्मीन शफीक असे 12 जणांचे उमेदवारी अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले.