भाजपचे सरकार लवकरच सत्तेत- आमदार प्रशांत बंब यांची माहिती

दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद  

खुलताबाद,१४ नोव्हेंबर/प्रतिनिधी :- कोणाच्याही कुबड्या न घेता दीर्घकाळ टिकणारे भारतीय जनता पक्षाचे सरकार लवकरच राज्यात सत्तेत येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. राज्यात सत्तेवर कसे येणार ते येथे सांगणार नाही. मात्र सत्तेत नक्कीच येणार असल्याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.वीरमगाव संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित दीपावली स्नेह मिलन व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.  आमदार बंब यांनी कार्यकर्त्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतली.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल जी गायकवाड, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, भीमराव खंडागळे, दिनेश अंभोरे, संदीप निकम,अमोल गवळी,विकास कापसे आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत बंब यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना बंब म्हणाले की, गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले एक हजार कोटींची कामे रद्द झाल्यामुळे मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हैसमाळ पर्यटन विकास प्राधिकरण एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला असून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हैसमाळ पर्यटन विकास प्राधिकरण एक हजार कोटी रुपयांच्या  निधीची मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर देशाची उंची वाढविण्याचे काम होत आहे. मराठवाड्याच्या हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्रात चालला आहे. सरकारला आर्यन खान सर्वात मोठी समस्या वाटत आहे, राज्यातील इतर समस्या सोडवण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अत्यंत चांगले काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कापसे यांनी केले.