स्त्री-पुरुषांनी जीवनात माणुसकी जपत कार्य करावे – डॉ. मेहरुन्नीसा पठाण

Displaying _DSC2824.JPG

कौमी सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि ताराबाई शिंदे अभ्यास केंद्रा तर्फे व्याख्यान

औरंगाबाद,२४ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- जात, धर्म, पंथ, लिंग याचा विचार न करता महिला-पुरुषांनी जीवनात माणुसकी जपत कार्य करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे अभ्यास केंद्राच्या संचालक प्रोफेसर डॉ. मेहरुन्नीसा पठाण यांनी केले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात जिल्हा माहिती कार्यालय आणि ताराबाई शिंदे अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कौमी एकता सप्ताहानिमित्त ‘महिलांचे राष्ट्रीय उभारणीतील भूमिका व योगदान’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती पठाण बोलत होत्या. केंद्राच्या प्रा. अश्विनी मोरे, डॉ.सविता बहिरट, सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या संचालक श्रीमती वीणा होमे, माहिती अधिकारी मीरा ढास आदींची उपस्थिती होती.

Displaying _DSC2784.JPG

            श्रीमती पठाण यांनी राष्ट्र उभारणीत मादाम कामा, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी आदींनी अतुलनीय कार्य केलेले आहे. शिक्षण,आरोग्य, राजकारण आदींसह सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी मिळालेली आहे. यशस्वी जीवनात महिला, पुरुष एकमेकांना पूरक आहेत. जसे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसेच यशस्वी स्त्रीला पुरुषाचा आधार असल्याने प्रगती होत असते. तरीही जात, पंथ, धर्म, लिंगा बाबत जुनाट आणि कालबाह्य विचार दूर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,असे सांगत स्वानुभवातून त्यांनी सामाजिक ऋण, माणुसकीची आवश्यकता, भेदभाव दूर करणे याबाबत मार्गदर्शन केले.

            प्रा. मोरे यांनीही जात, धर्म, भेदभावरहित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. राष्ट्रीय उभारणीत महिलांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर पुरुषांनीही महिलांचे प्रश्न तत्काळात हाताळले. सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततीनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी त्यावेळी मांडले होते, असे सांगून महिला पुरुषांच्या योगदानाबद्दल त्यांनी मत मांडले.

            श्रीमती होमे यांनीही बेटी बचाओ, बेटी पढाओ, कौशल्ये विकसित करणे, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री पुरुष समानता, सामाजिक ऋण फेडणे आदी विषयांवर विचार मांडले.

            डॉ.बहिरट यांनीही महिलांचे योगदान यावर विचार मांडत स्त्री-पुरुष भेदभाव नाहिसा होऊन सर्वांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ.बहिरट यांनी केले आणि प्रा.मोरे यांनी आभार मानले.