दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल मिळणार नाही-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

निर्बंधमुक्तीसाठी लसीकरण अनिवार्य

लसीकरण उद्दिष्टपूर्तीसाठी  महसूल,पोलीस,आरोग्य विभागाचे विशेष पथकाची निर्मिती

Displaying DSC_7207.JPG

औरंगाबाद,७ मार्च / प्रतिनिधी :- लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी व मोफत धान्य पुरवठा मिळणार नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीत सर्व प्रकाराचे शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, डी-मार्ट, रिलायन्स आणि मोठ्या दुकानाच्या ठिकाणी दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र अ निवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

             बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, महानगरपालिका आयुक्त  अस्तिककुमार पांडेय , पोलीस अधीक्षक निमीत गोयेल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.तसेच सर्व तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दूरदृश प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            ग्रामीण भागातील लसीकरण उद्दिष्टपुर्तीसाठी ग्रामीण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय ठेवून तात्काळ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शेळके यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी दिले.

            लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हयात विशेष पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस,आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक लसीकरणाचा दुसरा डोस पात्र असूनही डोस न घेतल्याबाबतची तपासणी करून संबधित सुविधा न देण्याची कारवाई बाबत काम करणार आहे. ही कार्यवाही पेट्रोलपंप,  घरगुती गॅस सिलेंडर,  वितरण एजन्सी, रेशनवरील स्वस्त धान्य दुकान,मॉल, हॉटेल, मोठी दुकाने या ठिकाणी भरारी पथकाद्वारे तपासणी केली जणार आहे. यामुळे लसीकरणाचे प्रमाणे वाढून शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हयात लसीकरण मोहिम राबविण्याबरोबरच जिल्हा कोविड निर्बंध मुक्तीसाठी सदरील उपाययोजना करण्यात येत असल्याचे बैठकीत चव्हाण यांनी सांगितले.  

             रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेपूर्वी लसीकरण अनिवार्य करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी  यांनी नागरिकांची कोविन ॲपवरील नोंदणी अद्यावयत करुन लसीकरण झाल्याची नोंद करावी,तसेच 15 मार्च पर्यंत लसीरकणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबधित उपस्थितांना देण्यात आल्या . आज रोजी  जिल्हयातील 8 लाख 90 हजार 941 लसीचा दुसरी मात्र घेण्यासाठी पात्र असण्याऱ्या नागरिकांनी तात्काळ लस घेण्याबाबतचे आवाहनही प्रशासनामार्फत श्री. चव्हाण यांनी केले.