क्रांतीचौक वक्फ जमीनीचे संरक्षण करण्याच्या प्रकरणात खासदार इम्तियाज जलील यांची निर्दोष मुक्तता

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : पुराव्याअभावी खासदार यांच्यासह नगरसेवकांची निर्दोष मुक्तता

औरंगाबाद,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- क्रांती चौक येथील सर्वे नं. ७७ मधील वक्फ जमीनीवर बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळविणाऱ्याच्या ताब्यातुन वक्फ मालमत्ता सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतराविरुध्द गैरकायद्याची मंडळी जमवुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच तार कंपाऊंड तोडल्या प्रकरणी क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे नामे संजय मुरलीधर धुमाळ पो.ह. १२८४ नेमणुक क्रांतीचौक पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरुन दिनांक १६/०१/२०१६ रोजी कलम १४१, १४३, १४७, १४९, ४२७ भादवी सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु असताना काल न्यायाधीश पी.आर. शिंदे यांनी  न्यायनिवाडा देताना सबळ पुराव्याअभावी खासदार इम्तियाज जलील, अरुण बोर्डे, अब्दुल रहिम नाईकवाडे, आरेफ हुसैनी, फिरोज खान, गंगाधर ढगे, अश्पाक कुरेशी व इतर यांची निर्दोष मुक्तता केली.
क्रांती चौक येथील वक्फ जमीनीवर नामे हरप्रीतसिंग व्यक्तीने बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळकविल्याची तक्रार खासदार इम्तियाज जलील यांना त्यावेळी प्राप्त झाली होती त्याअनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी संबंधित विभागास अतिक्रमण निष्कासित करुन वक्फ जमीन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला ताब्यात घेण्याची सुचना केली होती. परंतु सदरील प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने खासदार इम्तियाज जलील हे आमदार असतांना त्यांनी व एमआयएम पक्षाच्या नगरसेवक व इतरांनी घटनास्थळी जावुन सदरील मालमत्ता वक्फ मंडळाच्या ताब्यात दिली होती.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने नामे हरप्रीतसिंग व्यक्तीवर क्रांतीचौक येथील ज्युबली पान सेंटर शेजारील वक्फ जमीन बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन जायमोक्यावरील सर्व सामान जप्त केले होते. खासदार इम्तियाज जलील यांच्यातर्फे आदिल बियाबानी यांनी काम पाहिले व त्यांना शेख अल्तमश अब्दुल लतीफ यांनी सहकार्य केले.