दिवाळीची मंगल पहाट स्वरमयी

मुकुल कुलकर्णी यांची ‘मोरे घर आवो’ आणि ‘संदेसवा लिख भेजो मोरे पीको’ पारंपरिक बंदीश रंगली 

दत्तात्रय गोगटे यांचे एकल तबलावादन  

शिरीष गोगटे 

औरंगाबाद ,४ नोव्हेंबर :-दिवाळी निमित्त सृजन कला मंच तर्फे शास्त्रीय संगीताची  बैठक आयोजित करण्यात आली होती.दिवाळीची ही मंगल पहाट स्वरमयी झाली. 
सृजन कला मंच प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम गुरुवारी झाला. वर्षांच्या खंडानंतर यंदा भाग्यनगर येथे डॉ .श्रीरंग देशपांडे यांच्या निवासस्थानी ही मैफिल आयोजित करण्यात आली होती. औरंगाबादस्थित आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सुप्रसिद्ध गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्या  मार्गदर्शनाखाली त्यांचा शिष्य परिवार सृजन कला मंचाच्या माध्यमातून शहरातील लोकांमधे शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी विविध उपक्रम करत असतो. 

दत्तात्रय गोगटे यांचे एकल तबलावादन

 
या  कार्यक्रमात दत्तात्रय गोगटे यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी ताल त्रितालात पारंपरिक पध्दतीने पेशकार, कायदे आणि बंदीशींचे सादरीकरण केले.विविध प्रकारच्या रचना त्यांनी पेश केल्या.

त्यानंतर पुण्याचे  मुकुल कुलकर्णी यांचे गायन झाले. त्यांनी सुरूवातीला राग ललत मधे तिलवाड्यातील पारंपरिक बंदीश ‘मोरे घर आवो’ आणि ‘संदेसवा लिख भेजो मोरे पीको’ ही द्रूत त्रितालातील बंदीश सादर केली.स्वर लालित्य, उत्तम लयकारी, उच्च दर्ज्याची तालीम, उपजत सांगीतिक बुद्धी व गोड गळ्याची देणगी याच्या  जोरावर त्यांनी थोड्याच वेळात सभा काबीज केली. त्यानंतर राग नटभैरवमधे ‘घरवा आयो सुघर बलमा’ ही आडाचौतालातील बंदीश आणि शेवटी ‘न कळे ज्ञान, न कळे पुराण’ या अभंगाने मैफिलीची सांगता केली.  त्यांना तबल्यावर अद्वैत टाकळकर आणि संवादिनीवर गजानन केचे ह्यांची उत्तम साथसंगत लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिजा सहस्रबुध्दे यांनी केले. सर्व कलाकारांनी दिवाळीची मंगल पहाट स्वरमयी करून रसिकांची भरभरून दाद मिळवली.

कार्यक्रमाला आमदार अंबादास दानवे, पं. शुभदा पराडकर,उद्दोजक राजा रांगणेकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

डॉ.अनिता देशपांडे यांनी  प्रास्तविकात कार्यक्रमा मागची भूमिका सांगितली. कार्यक्रमाला पं.शुभदा पराडकर, कल्याण अपार, शिवराम गोसावी, सुधीर व अविनाश बहिरगावकर, जयंत नेरळकर, दिलीप दोडके यांच्यासह अनेक कलावंत ,मिलिंद रानडे,डॉ.रोशन रानडे,सकाळचे निवासी संपादक  दयानंद माने, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने, रामेश्वर तोतला, डॉ सुधीर चौधरी आदी अनेक रसिक उपस्थित होते.सर्व संगीतप्रेमी रसिकही मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.