मध्य सप्तकातील गोदावरीच्या प्रवाहाला तार सप्तकातील सुरांची जेव्हा साथ मिळते !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व दिवाळीच्या औचित्याने गोदावरीच्या काठावर “दिवाळी पहाट” चा शुभारंभ

नांदेड ,४ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- गत दोन वर्षे अनेक आव्हानांशी झुंजणाऱ्या जीवनमानाला सर्वांच्याच दक्षतेने सुरक्षित आरोग्याची शाश्वती आल्याने जनजीवन पूर्ववत होऊ पाहत आहे. कोरोनाच्या आव्हानावर मात करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनीही दक्षता घेऊन सक्रिय साथ दिल्याने बहुप्रतिक्षेत असलेल्या “दिवाळी पहाट”च्या सुरांनी आज गोदावरीचा काठही क्षणभर थबकला.

जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व रसिक नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज पहाटे 17 व्या दिवाळी पहाट सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ झाला. विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, रसिक नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शंतनू डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने ही सुरांची मांदियाळी सूर्योदयाच्या साक्षीने सुरु झाली.  

महाराष्ट्राला वैचारिक, सांस्कृतिक अधिष्ठान देणाऱ्या नांदेडमध्ये सर्व सांस्कृतिक प्रेमी व प्रशासनाने एकत्र येऊन सन 2005 पासून “दिवाळी पहाट” ची नवी नांदी सुरू केली. कोरोनामुळे गत दोन वर्षांचा व्यत्यय सोडला तर हा महोत्सव गोदावरीचा काठावर 16 वर्षांपासून अव्याहत वाहतो आहे. निसर्गत:च ऊब घेऊन असलेल्या गोदावरीच्या कुशीतील या रम्य पहाटेच्या प्रतिक्षेत वर्षेभर प्रत्येकजण असतो. आज 4 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ही रम्य पहाट तेवढीच उबदार व अल्हाददायक झाली ती कवी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार अश्वासक सुत्रसंचलनाने.


 
डिजिटल माध्यमांमुळे मानसे कितीही जुळल्या गेली तरी त्या भेटीत नेमका सूर गवसेलच असे नाही. मैफिलित सूर प्रत्यक्ष भेटीला येतात. सोळावं वर्षे धोक्याचं याची प्रचिती या महोत्सवालाही आल्याचे आपण अनुभवले, अशी मिश्कील टिपणी कार्यक्रमाचे संचलन करणारे डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी करुन सकाळच्या या वातावरणाला आणखी ऊबदार केले. प्रेमातील ऊर भेटीपेक्षा सूर भेटी या अधिक उभारी देणाऱ्या असतात. कोरोनातून सावरतांना विश्वासार्हतेबरोबर जी स्वसुरक्षिततेची, स्वजबाबदारीची भावना आवश्यक आहे त्या भावनेला गुंफत डॉ. मुलमुले यांनी या पहाटेलाही जबाबदारीचे भान दिले.  
 
राग भूप मधील पूर्वेच्या देवा तुला सूर्य देव हे नाव या गितापासून माझे जीवनगाने, धुंदी कळ्यांनो, ऋणानुबंधाच्या… ते निघालो घेऊन दत्ताची पालखी पर्यंत एकावर एक अशी सरस गानी प्रख्यात गायक संजय जोशी यांनी  सादर केली. त्यांना औरंगाबादच्या वर्षा जोशी यांनी साथ दिली. संगित साथ  जगदीश देशमुख, भार्गव देशमुख, स्वरुप देशपांडे, स्वरेश देशपांडे, शेख नईम यांनी दिली.
 
ही “दिवाळी पहाट” रसिक नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शंतनू डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मण संगेवार, सुरेश जोंधळे, ॲड गजानन पिंपरखेडे, विजय बंडेवार, बापू दासरी, उमाकांत जोशी, विजय जोशी, सुनिल नेरलकर, विजय होकर्णे, वसंत मैय्या, हर्षद शहा, चारुदत्त चौधरी, रत्नाकर अपस्तंभ, प्रमोद देशपांडे, डॉ. भरत जेठवाणी, दिपक मुळे, राघवेंद्र कट्टी, कविता जोशी-शिरपूरकर यांच्या योगदानातून साकारली.