चाचण्यांचे प्रमाण दररोज दहा हजारापर्यंत वाढविण्याची सूचना- पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दि.25, :- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणांनी व प्रशासकीय यंत्रणांनी वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करावेत. तसेच रुग्णासाठी आवश्यक बेड, ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर यांची संख्या वाढवून रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण दररोज दहा हजारापर्यंत वाढविण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकप्रतिनिधींच्या कोरोना परिस्थितीचा आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांना दिली.

May be an image of one or more people, people standing, people sitting and indoor

यावेळी सर्वश्री आमदार सतीष चव्हाण, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, आदींची उपस्थिती होती.

लोकप्रतिनिधींच्या कोरोना बाबत आढावा बैठकीस सुरूवातीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या, ॲक्टीव रुग्ण संख्या, विविध रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णबेड संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यानंतर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रुग्णालये नसलेल्या आवारातील मेडिकल दुकाने बंद करण्याबाबत सूचना केली. तसेच अंबादास दानवे यांनी आगामी होळी आणि रंगपंचमी गर्दी करुन साजरी न करण्याबाबत तसेच जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे यावर बंदी घालण्याबाबत सूचना केली. त्याचप्रमाणे आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात उपलब्ध बेडची माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केली. त्याचप्रमाणे जर लॉकडाऊनचा पर्याय निवडला तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी शिवभोजन थाळीचा पर्याय उपलब्ध ठेवावा अशा सूचना सदरील बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या बैठकीत केल्या.

आढावा बैठकीत बोलताना श्री. देसाई म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोणत्याही रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णाची सुविधे अभावी अबाळ होणार नाही यासाठी शासनस्तरावरुन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने सभागृहे, मंगल कार्यालये ताब्यात घ्यावी. तपासणी केंद्रे 500 पर्यंत वाढविण्याची गरज असून या दृष्टीने नियोजन करावे. तसेच खाजगी रुग्णालयाकडून अवाजवी शुल्क जर घेतले जात असेल तर यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री.देसाई यांनी केल्या. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यात लोकप्रतिनिधी यांच्या सूचनेप्रमाणे तक्रारी दूर करुन सुविधा वाढ आणि कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भात योग्य ते निर्णय वेळोवेळी घेतले जात आहेत. यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करावेत, अशी सूचना बैठकीत श्री.देसाई यांनी प्रशासनाला केल्या.