कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती अभियानात सहभागी व्हा-महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

औरंगाबाद परिमंडलात ५१ हजार जणांचा सहभाग

औरंगाबाद,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. औरंगाबाद परिमंडलातील ५१ हजार ५२९ शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. सर्व कृषिपंपधारकांनी या अभियानात वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
    या अभियानात वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्यांसह विद्युत यंत्रणेच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. थकबाकीमुक्ती व गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिलाच्या मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीही माफ करण्यात येत आहे. या अभियानात थकबाकी व चालू वीजबिलांपोटी औरंगाबाद जिल्ह्यातील ३३ हजार ८२ ग्राहकांनी १८ कोटी ६६ लाख व जालना जिल्ह्यातील १८ हजार ४४७ ग्राहकांनी ९ कोटी ४२ लाख रुपये वीजबिल भरले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १९९१ तर जालना जिल्ह्यातील ८१० शेतकरी पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरली आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे. https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक टाकून कृषिपंप थकबाकी व सवलतीचा तपशील पाहण्याची तसेच बिल भरण्याची सुविधा आहे. शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.