नांदेड जिल्ह्यात पेरणीला वेग ,20.5 टक्के क्षेत्रावर पेरणी

नांदेड ,१९जून/प्रतिनिधी :- जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून पेरणीला वेग आला आहे. आत्तापर्यंत सुमारे 48 हजार 915 हेक्टरनुसार 20.5 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. शिवाय गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अनेक लघू-मध्यम प्रकल्पात पाणीसाठा असल्याने जमिनीतला ओलावा बर्‍यापैकी कायम होता. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरणीची लगबग सुरू केली होती. सोयाबीन, कापूस, हळद, तूर, मूग, उडीद व ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.

शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणी करू नये, अतिवृष्टीमुळे बियाणे जाईल वाया ; कृषी  विभागाचा सल्ला

गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात 166.40 मिलिमीटरनुसार 20 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिरायती भागांत सोयाबीन, कापूस, ज्वारीसह आंतरपिकांची लागवड केली जात आहे. गतवर्षी सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या तक्रारी आल्या होत्या. यंदा अशा तक्रारी नसल्यातरी व्यापारी जादा दराने बियाणे विक्री करत असल्याची ओरड आहे. कृषी विभागाने पेरणीची गडबड करू नये असे आवाहन केले होते, पण पेरणीयोग्य पाऊस झालेल्या भागांत शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली असून काही भागांत उगवणही चांगली झाल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून आढळून आले आहे.

—————————————————

शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. भरारी पथके काय कारवाई करतात हा एक संशोधनाचा विषय आहे.

– श्रीधर हंबर्डे, शेतकरी, बीजेगाव, ता. उमरी.

—————————————————–

गतवर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात यंदा  सुमारे साडेआठ हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल. त्यापैकी 4 लाख हेक्टरवर सोयाबीन तर सव्वा दोन लाख हेक्टरवर कापसाची लागवड होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्यस्थितीत पिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण आहे, पण सोयाबीन बियाणांचा काळा बाजार सुरू झाला आहे. नामांकित कंपनींचे बियाणे आत्तापर्यंत 3 हजार रुपयांपर्यंत मिळत होते, पण आता त्याचा दर 4 हजारापर्यंत गेला आहे. शेतकर्‍यांना नाइलाजास्तव जादा दराने खरेदी करावी लागत आहे.