उमरगा येथील डॉक्टर आर डी शेंडगे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नारायण गोस्वामी
उमरगा,२६ ऑक्टोबर:-वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या व रुग्णाची आणि  शासनाची करोडो रुपयेची फसवणूक करणाऱ्या  येथील  डॉक्टर आर डी शेंडगे याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला . यामुळे डॉक्टर शेंडगे यांना दिलासा मिळाला नसून गेल्या १५ दिवसापासून फरार असणाऱ्या आरोपी डॉक्टर शेंडगे यांच्या मुसक्या  पोलिस कधी आवळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . 

बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले. आर डी शेंडगे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे लॅब ब्लड रिपोर्ट गरजेनुसार कमी जास्त म्हणजे चुकीचे बनविल्या प्रकरणी व रुग्ण ऍडमिट नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय बील उचलल्या प्रकरणी उमरगा येथील डॉ शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे व तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने या घोटाळ्या प्रकरणी चौकशी अहवालानुसार पोलिसात तक्रार द्यायचा प्रयत्न केला होता माता त्यावेळी गुन्हा नोंद झाला नव्हता .अखेर त्यात गुन्हा नोंद झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्याबरोबर डॉक्टर आर डी शेंडगे हे अद्याप फरार आहेत . दरम्यान १४ आक्टोबरला आपल्या वकिला मार्फत डॉक्टर शेंडगे यांनी अटकपूर्व जामीनकरिता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता . त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनुभुले यांनी आपल्या आदेशात डॉक्टर शेंडगे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला .  त्रिसदस्यीय  समितीसमोर आलेले डॉक्टरचे हस्ताक्षरनमुना  आणि डॉक्टर यांनी बनसोडे यांच्याकडे दिलेल्या कागदावर असलेले हस्ताक्षर नमुना  यात तफावत दिसून आली . किती रुपयेचा घोटाळा केला?किती विमा कंपन्याकडून फायदा करून घेतला या कारणास्तव डॉक्टर आर डी शेंडगे यांची अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांनी आज २६ आक्टोबर रोजी फेटाळला.