अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर

मुंबई ​,१५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कुख्यात डॉन अरुण गवळी याला मुलाच्या लग्नासाठी चार दिवसांचा सुरक्षेविना पॅरोल मंजूर केला आहे.अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात कैद आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला संचित रजा देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कमी कालावधीचा पॅरोल मंजूर केला आहे.

अरुण गवळीच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला लग्न आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करण्यात आला होता. यावर अरुण गवळीने पोलिसांच्या सुरक्षा कड्यामध्ये जावे, हा खर्च गवळी यानेच करावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर कोर्टाने गवळीला पॅरोल मंजूर करताना पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाण्याची परवानगी दिली आहे.

मे २०२० मध्ये लॉकडाऊन शिथील केलेला असताना अरुण गवळीच्या मुलीचे लग्न होते. तेव्हा देखील गवळीला पॅरोल देण्यात आला होता. हे लग्न २९ मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीचे लग्न झाले होते.