ऑटो पार्टस लंपास करणाऱ्या पसार आरोपीला तब्बल वर्षभरानंतर सिडको पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद,१४ जुलै /प्रतिनिधी :- अविष्‍कार कॉलनी येथील बॅडमिंटन हॉल समोर उभ्‍या केलेल्या ट्रकमधुन एक लाख २२ हजार ८१० रुपये किंमतीचे ऑटो पार्टस लंपास करणाऱ्या पसार आरोपीला तब्बल वर्षभरानंतर बुधवारी दि.१३ रात्री सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरेफ ऊर्फ बंबईया यासीन अन्‍सारी (३५, रा. चिस्‍तीया कॉलनी) असे आरोपीचे नाव असून त्‍याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी गुरुवारी दिले.

या प्रकरणात नितीन भास्कर जाधव (२३, रा. टाकळी राजेराव ता. खुलताबाद) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी हे शुभम आगे यांच्‍या ट्रकवर चालक म्हणुन काम करतात. ५ जुलै २०२१ रोजी एमआयडीसी वाळुज येथील महासागर रोडवेज यांच्‍याकडून व्हेरॉक इंजिनिअरिंग  लिमीटेड कंपनीतून स्‍पेअर पार्टस भरण्‍याची ऑर्डर  घेतली होती. त्‍यानूसार रात्री साडेनऊ वाजेच्‍या सुमारास फिर्यादीने ट्रकमध्‍ये माल भरला. त्‍यानंतर फिर्यादीने ट्रक अविष्‍कार कॉलनी येथील बॅडमिंटन हॉल समोर उभा केला. व ते जेवण करण्‍यासाठी मित्राच्‍या रुमवर गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेच्‍या सुमारास फिर्यादी व ट्रक मालक आगे असे दोघे ट्रक जवळ आले असता ट्रक मधील एक लाख २२ हजार ८१० रुपये किंमतीचे स्‍पेअर पार्ट चोरीला गेल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपास करुन शरीफ ऊर्फ बाबा रशीद शहा (३०, रा. नारेगाव) याला २९ जुलै २०२१ रोजी अटक केली. त्‍याने गुन्‍ह्याची कबुली देत सदरील गुन्‍हा आरेफ ऊर्फ बंबईया अन्‍सारी याच्‍या साथीने केल्याचे कबुल केले. दरम्यान परिसरात गस्‍त घालणाऱ्या पोलिसांना मिळालेल्या माहिती आधारे त्‍यांनी बुधवारी दि.१३ रोजी आरोपी आरेफ ऊर्फ बंबईया अन्‍सारी याला अटक केली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी आरोपीकडून गुन्‍ह्यातील ऐवज हस्‍तगत करायचा आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तसेच आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.